Wed. Oct 5th, 2022

संजय राऊतांचा ओवैसींवर हल्लाबोल

एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद दौऱ्यादरम्यान गुरुवारी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. मात्र, औरंगजेबाच्या कबरीचे अकबरुद्दीन ओवैसी यांनी दर्शन घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘औरंगजेबाच्या कबरीपुढे माथा टेकणाऱ्यांनो, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल’, असा हल्लाबोल संजय राऊतांनी ओवैसींवर केला आहे.

अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामळे संजय राऊतांनी ओवैसींवर कडक शब्दात टीका केली आहे. ते म्हणाले, ‘औरंगजेबाला महाराष्ट्राच्या याच मातीत गाडलं होतं, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल हे लक्षात ठेवा’, अशी संतप्त प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकवत महाराष्ट्रात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न ओवैसींकडून होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आव्हान स्विकारण्यास तयार आहोत, असे राऊत म्हणाले.

अकबरुद्दीन ओवैसी यांनी दुपारी खुलाताबाद येथील हजरत सय्यद जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्गेत जाऊन दर्शन घेतले. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दर्गेत गेल्यानंतर अकबरुद्दीन ओवैसी औरंगजेबाच्या कबरीस्थळी पोहचले. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली. त्यानंतर त्यांनी अनेक दर्गांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत इम्तीयाज जलील, वारीस पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.