‘राज ठाकरेंच्या भेटीनंतर समाधानी’ – वसंत मोरे

पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर १०० टक्के समाधानी असल्याची प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.
वसंत मोरे म्हणाले, ‘राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मी १०० टक्के समाधानी आहे. आपल्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. तसेच मनसे साडून जाणार नसून पक्षातच राहणार असल्याचे वसंत मोरे म्हणाले आहेत. दरम्यान, ठाण्याच्या सभेत उत्तर मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मनसेत मुसलमानांचे नाराजी नाट्य सुरू होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांना भेटण्यास बोलवले. यानुसार, आज वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे निवासस्थानी भेट घेतली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील अनधिकृत भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरेंच्या वक्तव्याचे काही भाजप नेत्यांकडून स्वागत करण्यात आले. मात्र, मनसेच्या अनेक मुसलमान नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. तसेच माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी ठाकरेंच्या या वक्तव्यावर वेगळी भूमिका मांडली होती. या कारणामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची निवड केली आहे.