Mon. Jan 17th, 2022

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कल्याणच्या बाल विकास मंदिर शाळेचा अनोखा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यात कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार असले तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. येणारे प्रत्येक नवीन सरकार शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून कर्जमाफीची घोषणा जाहीर करतात. एवढे करूनही शेतकरी कर्जमुक्त होत नाही.

या वास्तविकतेवर प्रकाश टाकत कल्याण मधील बाल विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यावर प्रकल्प बनविला आहे.

हा प्रकल्प रिजेन्सी ग्रुप व डावखर इन्फ्रास्ट्रक्चरचे संतोष डावखर यांच्या वतीने गोळवली येथील रिजेन्सी आनंतम येथे आयोजित केलेल्या शिवकालीन आरमार व सौर ऊर्जा प्रदर्शनात सादर केला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आणि आत्महत्या कमी करणे असा हा प्रकल्प आहे.

प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रे ठेवण्यात आली आहे. शिवाय शिवकालीन जहाजाच्या थ्रीडी प्रतिकृती मांडण्यात आली आहे. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीने परकीय शत्रूंमध्ये एक भीती निर्माण केली होती. आरमाराबरोबर स्वराज्य स्थापन करताना घडलेली युद्धे, तलवारी धडाडलेल्या तोफा, आणि आनंदलेली रणवाद्य आणि अनेक शस्त्रांचे प्रदर्शन डोंबिवलीत भरले आहे. या प्रदर्शनात २१ शाळांनी आपले प्रकल्प सादर केले.

हे प्रदर्शन पाहण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यानी भेट दिली. या प्रदर्शनात बाल विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यावर प्रकल्प सादर केला आहे.

शेतीच्या एकर जागेसाठी २६६६ पॅनल्स बसवता येतील. यापासून तयार झालेली ६६६ किलोवॅट वीजनिर्मिती शेतकरी सरकारला विकू शकतो. त्यातून शेतकऱ्याला रोज १०,८०० उत्पन्न म्हणजे वर्षाला ३०-३२ लाख रुपये उत्पन मिळेल.

कोरडवाहू शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर असून भूमी वर्षाला सर्व दिवस उत्पादक राहते. अणू उर्जेसारखे अपघातग्रस्त नाही. वीज निर्मितीसाठी पाणी,इंधने,रसायने याची गरज नाही. कच्चा माल सतत आयात करावा लागत नाही किंवा त्याची वाहतूक करावी लागत नाही,अशी माहिती शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात आलेल्या विद्यार्थ्यांना दिली.

के.आर.कोटेकर विद्यालयाने सोलर स्मार्ट सिटी प्रकल्प, सिस्टर निवेदिता शाळेने सौर उर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला. तसेच सौर उर्जेचे महत्व आजच्या पिढीला कळावे म्हणून या प्रदर्शनात विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सौर उर्जेवर प्रकल्प सादर करण्यात आले आहे. हे विनामुल्य प्रदर्शन दोन दिवस राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *