पार्थ पाठोपाठ ‘जय अजित पवार’ही निवडणुकीच्या रिंगणात?

पार्थ पवारनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुसरा मुलगा जय अजित पवारदेखील राजकारणात उतरण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा पिंपरी-चिंचवड शहरात आहे. जय यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात फलक लागले आहेत. यावर पवार कुटुंबियांचे फोटो वापरण्यात आले आहेत.

‘महाराष्ट्राचे युवा नेतृत्व जय अजित पावर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ अशा आशयाचे फलक शहरात लागल्याने चर्चेला उधाण आलं आहे. या आधी असे जय पवार यांचे फलक शहरात कधीच लागले नाहीत.

मावळ लोकसभेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे राजकारणात उतरले होते. परंतु, त्यांना त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, ज्या प्रकारे जय यांचे पिंपरी-चिंचवड शहरात फलक लागले आहेत त्यावरून तरी ते राजकारणात उतरतील अशी आशा येथील कार्यकर्त्यांना आहे.

पार्थ पवार यांचे देखील लोकसभेच्या अगोदर अश्याच प्रकार चे पिंपरी-चिंचवड शहरात फलक लागले होते. त्यानंतर त्यांनी थेट अजित पवार यांच्या सोबत अनेक सभांना उपस्थिती लावत निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. सध्या शहरात लागलेल्या फलकावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि जय पवार यांचे फोटो लागलेले दिसत आहेत.

Exit mobile version