Tue. Feb 18th, 2020

जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची निर्घृण हत्या

वृत्तसंस्था, बंगळुरू

कर्नाटकातील जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री 8 वाजता राहत्या घरी त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. दोन गोळ्या छातीवर लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी गौरी लंकेश यांच्यावर 50 मीटर अंतरावरुन सात गोळ्या झाडून तेथून पोबारा केला.

 

या हत्येप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरमैया यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. गौरी शंकर हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी केली आहे.

 

कोण होत्या गौरी लंकेश – 

‘लंकेश पत्रिका’ या प्रसिध्द कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. वैचारिक मतभेदांमुळे त्या अनेकांच्या निशाण्यावर होत्या. एक निर्भीड आणि बेधडक पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. हिंदुत्व ब्रिगेड विरोधात त्यांनी अनेकदा आवाज उठवला होता.

 

गौरी लंकेश  दिवंगत साहित्यिक पी. लंकेश यांच्या कन्या होत्या. कर्नाटकातील प्रतिष्ठित वर्तमानपत्रांसाठी गौरी लंकेश यांनी अनेक लेख लिहिले होते. इंग्रजी आणि कन्नड भाषेत त्यांचे अनेक लेख प्रसिध्द झाले होते.

 

गौरी लंकेश यांच्याविरोधात भाजप खासदार प्रल्हाद जोशी यांच्यावर झालेल्या अब्रुनुकसानीच्या आरोपामध्ये कर्नाटक मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. याविरुध्द वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. 2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी त्या दोषी आढळल्या होत्या.  

 

पोलीस हल्लेखोरांचा तपास करत असून लंकेश यांचा भाऊ इंद्रजित यांनी या हल्ल्याचा तपास सीबीआयकडून करण्याची मागणी केली आहे.   

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *