Tue. Oct 19th, 2021

5 वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणी शाहरूख खानला अटक!

तब्बल 4 दिवस चाललेल्या अपहरणनाट्यानंतर अखेर वाकड पोलिसांनी पाच वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या मोहम्मद शकील सलीम खान आणि शाहरुख मिराज खान या दोन आरोपींना अटक केलं आहे. चार दिवसानंतर मुलाची केली सुखरूप सुटका झाली आहे. 5 वर्षीय सुफियान खान याचं चार दिवसांपूर्वी दोन व्यक्तींनी अपहरण केलं होतं. हे अपहरण दोन्ही आरोपीने कर्जबाजारी आणि लहान भावाच्या लग्नसाठी लागणाऱ्या पैश्यासाठी केल्याची कबुली दिली आहे.

कसा रचला अपहरणाचा प्लॅन?

आरोपी शाहरुख मिराज खान या आरोपीचं झमझम केटर्स आणि बिर्याणी हाऊस असून त्याच्याकडे मोहम्मद शकील कामासाठी होता. त्याच्या शेजारीच अपहरण झालेल्या मुलाचे म्हणजेच सुफियान याच्या आईचं लेडीज ब्युटीपार्लर आहे. त्याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्या पंधरा वर्षांपासून खान कुटुंब राहत आहे. त्यामुळे सुफियानची शाहरुखशी ओळख होती आणि त्यांच्यात जवळीक झाली होती.

मात्र गेल्या चार महिन्यांपासून आरोपीने झमझम केटरर्स आणि बिर्याणी हाऊस हे दुकान ब्युटी पार्लरच्या शेजारी थाटलं होतं. आरोपी शाहरुख खान याला अनेक वेळा सुफियानच्या आईने आर्थिक मदत केली होती. आरोपी शाहरूखला आणखी पैसे हवे होते. मात्र सुफियानच्या कुटुंबाने आणखी पैसे देण्यास नकार दिला. खान कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची माहिती असल्याने शाहरूखने 5 वर्षीय सुफियानचं अपहरण करायचं ठरवलं. यात कर्मचारी मोहम्मद यालादेखील सहभागी करून घेतलं.

रविवारी दुपारी सुफीयान हा ‘कुणाल सोसायटी’ इमारतीच्या पार्किंगमध्ये मित्रांसोबत खेळत होता. यावेळी आरोपी शाहरुख हा दुचाकीवर आला आणि सुफीयानला घेऊन तो दुचाकीवरून पसार झाला. सुफीयान ओळखीचा असल्याने त्याला घेऊन जाण्यास जास्त कष्ट पडले नाहीत. परंतु सुफीयान दिसत नसल्याने आई वडील घाबरले. त्यांनी शोध सुरू केला परंतु सुफीयान काही मिळत नव्हता. त्याच्या मित्राला विचारलं असता त्याला कोणीतरी घेऊन गेल्याच सांगितलं. याप्रकरणी आई वडिलांनी वाकड पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दिली…

sufiyan.png

‘ते’ 100 तास!

अपहरण केल्यानंतर मुलाला शिक्रापूर येथील लॉजवर घेऊन जाण्यात आलं. सुफीयानला दिवसभर ते लोणावळा, वसई विरारला घेऊन गेले होते. तब्बल दोन दिवसांनी सुफीयानच्या आईला शाहरुखचा फोन आला. त्यात त्याने पाच लाख रुपयांची खंडणी मागत मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. खान कुटुंबाने शाहरूखला पैसे देण्यास होकार दिला. 7 नोव्हेंबरला चिंचवड येथील बस स्थानकावर पाच लाख रुपये घेऊन येण्यास खान कुटुंबियांना संगण्यात आलं.

वाकड पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी वेषांतर करून सापळा रचला आणि दोन्ही आरोपींना अटक केली.

आरोपी शाहरुखच्या लहान भावाचे लग्न होतं. त्यासाठी त्याला पैसे हवे होते. तसंच मोहम्मद शकील हा कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे तो देखील या कटकारस्थानात सहभागी होता. वाकड पोलिसांच्या 5 टीम तर गुन्हे शाखेच्या 2 टीम मुलाचा शोध घेत होत्या. अखेर मुलाला सुखरूप सोडवण्यात वाकड पोलिसांना यश आलं.

तीन रात्र-चार दिवस नजरकैद आणि शंभर तासानंतर सुफियानची सुटका झाली. अगदी चित्रपटाला साजेसं हे अपहरणनाट्य पिंपरी चिंचवडमध्ये घडलं. तब्बल शंभर तासानंतर अपहरणकर्ते शाहरुख खान आणि शकील खान यांच्या तावडीतून पोलिसांनी सुखरूप सुटका केलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *