Thu. Apr 22nd, 2021

दिल्लीच्या तबलिगी मरकजबद्दल रोज TV वर दाखवायची गरज काय?- शरद पवार

दिल्लीमध्ये तबलिगी जमात मरकजच्या धार्मिक कार्यक्रमानंतर उसळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सवाल केला आहे. दिल्लीला तबलिगी मरकजच्या कार्यक्रमात जे घडतं, ते रोज टीव्हीवर दाखवण्याचं कारण काय? यातून आपण काय परिस्थिती निर्माण करत आहोत? असे प्रश्न शरद पवार यांनी विचारले आहेत. फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना त्यांनी हा प्रश्न विचारलाय.

तबलिगीच्या कार्यक्रमाबद्दल बोलताना शरद पवार यांनी म्हटलं, की कोरोनाचं संकट असताना अशा परिस्थीतीत कार्यक्रम घेणं योग्य नव्हे. त्यांना परवानगी नाकारायला हवी होती. महाराष्ट्रात अशी परवानगी नाकारण्यात आली होती. दिल्लीतही अशी परवानगी तेव्हा नाकारली असती, तर नंतर वारंवार टीव्हीवर एकाच संप्रदायाच्या लोकांबद्दल चित्र मांडून सामाजिक तेढ वाढवण्याची संधी मिळाली नसती.  

या परिस्थितीत सर्वांनी मतभेद विसरून एकत्र राहण्याची गरज आहे. कटुता, संशय निर्माण होईल अशी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. टीव्हीवर तसंच Whatsapp वरचे मेसेजेस चिंता निर्माण करणारे आहेत. यांतले ५ पैकी ४ मेसेजेस खोटे असतात, हे तपासांती दिसून येतं. मात्र असे मेसेज संभ्रम निर्माण करतात. असा गैरसमज कुणी जाणीवपूर्वक निर्माण करत आहेत, अशी मला शंका वाटते, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

दिल्लीमध्ये जे घडलंय, ते रोज टीव्हीवर दाखवायची गरज आहे का, आपण त्यातून काय परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न करत आहोत, याचा विचार करायची ही वेळ आहे, असं पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *