केतकी चितळेवर शरद पवारांची प्रतिक्रिया

अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. फेसबुकच्या माध्यमातून केतकीने पवारांविरोधात पोस्ट केली आहे. त्यामुळे सर्व स्तरावरून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी नेत्यांनी केतकीवर टीका केली आहे. दरम्यान, शरद पवारांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. मला केतकीबाबत काहीही बोलायचं नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
शरद पवार म्हणाले, मला याविषयी काहीही ठाऊक नाही. कोणत्या व्यक्तीने टीका केली आणि ती व्यक्ती काय बोलली, हे मला माहित नाही. संबंधित व्यक्ती नेमकं काय बोलली, हे जाणून घेतल्याशिवाय मी याप्रकरणी प्रतिक्रिया देणं योग्य नाही, असे पवार म्हणाले.
शरद पवार यांनी त्यांच्याविरोधात होणाऱ्या तक्रारींवरही भाष्य केलं. ते म्हणाले, मी एका काव्याचा उल्लेख केला होता. मात्र, त्यांचे वेगळं चित्र नागरिकांसमोर मांडण्यात आलं. ते वास्तव नव्हते, असे पवार म्हणाले. अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावर बोलताना पवार म्हणाले, महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत असून या सगळ्याचा निषेध केला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
‘मविआचे सरकार दहा वर्ष टिकेल’
तसेच, मविआचे सरकार सत्तेत आल्यापासून विरोधक मविआवर सतत टीकास्त्र करत आहेत. तसेच मविआचे सरकार टीकणार नसल्याची टीकाही विरोधकांकडून करण्यात आली आहे. यावर शरद पवारांनी, मविआचे सरकार दहा वर्ष टिकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, केतकी चितळे हिच्याविरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पुणे आणि साताऱ्यातही केतकीविरोधात राष्ट्रवादीतर्फे गुन्हा दाखल झाला आहे. केतकी चितळेविरोधात राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे.