Fri. Oct 7th, 2022

शेलारांनी साधला आदित्य ठाकरेंवर निशाणा

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महाराष्ट्र सरकारला तब्बल १२ हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. पर्यावरणाचे नियम न पाळल्याबद्दल शिंदे सरकारला हा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायमूर्ति आदर्श कुमार गोयल  यांनी राष्ट्रीय हरित लवाद कायद्याच्या कलम ९५ अंतर्गत हा दंड ठोठावला आहे. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत दोन ट्विट केले आहेत.

‘सोशल मीडियावर’ पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या’ पेंग्विन सेना प्रमुखांकडून हा दंड वसूल करायचा का?’ असं म्हणत आशिष शेलार यांनी बोचरी टीका केली आहे. कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याने पर्यावरणाची हानी केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. प्रदूषणमुक्त वातावरण देणे ही राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची घटनात्मक जबाबदारी आहे, असे लवादाने म्हटले आहे.

‘हा दंड दोन महिन्यात भरायचा आहे, मग आता… सांग सांग भोलानाथ… हा दंड पालिकांमध्ये सत्ता असलेल्यांकडून… अडीच वर्ष पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून… सोशल मीडियावर ‘पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या’ पेंग्विन सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का?’ असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हरित लवादाच्या म्हणण्यानुसार पर्यावरणाची हानी केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र सरकार घन आणि द्रव कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरल्याचंही म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.