Sun. Aug 25th, 2019

शिल्पा शेट्टीकडून साईचरणी सुवर्णमुकुट अर्पण

0Shares

शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी दररोज कोट्यवधींचे दान होत असतं. काही श्रीमंत भाविक तर सोन्या चांदीच्या दागिन्यांपासून ते भरमसाठ नोटांपर्यंत अनेक गोष्टी साईबाबांच्या झोळीत टाकत असतात. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीही याला अपवाद नाही. साईंची भक्त असणाऱ्या शिल्पाने साईबाबांना सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या कुटुंबासह शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेतलं. शिल्पासह तिचा पती राज कुंद्रा, तिचा मुलगा, तिची आई आणि बहीण शमिता शेट्टीही होती. या वेळी दर्शन घेतल्यावर शिल्पाने साईबाबांना सुवर्ण मुकुट अर्पण केला. या मुकुटाचं वजन 800 ग्रॅम आहे, तर अंदाजे किंमत 25 लाख रुपये आहे.

हा मुकुट दान केल्यावर हा मुकुट साईबाबांच्या मूर्तीच्या मस्तकी परिधान करावा, अशी विनंती शिल्पा शेट्टी हिने केली. तिच्या विनंतीला मान देऊन सुवर्णमुकुट काही वेळासाठी साईबाबांच्या मस्तकावर चढवण्यात आला. त्यानंतर करण्यात आलेल्या धूपारतीलाही शिल्पा शेट्टी कुटुंबासह थांबली. शिल्पा शेट्टी वर्षातून एकदातरी शिर्डीला साईबाबांचं दर्शन घ्यायला येते.

आपण सोन्याचं किती दान केलंय, यापेक्षा आपल्या मनातील श्रद्धा, शुद्ध भावना जास्त महत्वाची असल्याचं आपण मानतो, असं शिल्पाने म्हटलंय.

शिल्पा शेट्टी मंदिरात आल्याचं वृत्त समजताच साईंच्या भाविकांसह शिल्पाच्या चाहत्यांचीही मोठी गर्दी जमा झाली. साई संस्थानाच्या वतीने शिल्पाचा शाल आणि मूर्ती देऊन गौरवही करण्यात आला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *