सांगली आणि धुळ्यात शिवसैनिक आक्रमक

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात राजकीय वादळ आले आहे. मात्र, महाराष्ट्रातील शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे चित्र राज्यातील काही ठिकाणी दिसले आहे.
सांगलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी ‘एकनाथ भाई परत या’ अशी साद शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंना घातली आहे.
शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याविरोधात धुळे जिल्हा शिवसैनिक रस्त्यावर उतरले. एकनाथ शिंदेसारख्या अनेकांनी बंड केले, मात्र शिवसेना संपवू शकले नाहीत. शिवसेना आहे त्यापेक्षा अधिक ताकदीने उभी राहील आणि बंड करणाऱ्यांना अद्दल घडेल असा विश्वास धुळे जिल्हा शिवसैनिकांनी व्यक्त केलेला आहे. धुळे शहरातील शिवसेना कार्यालयांमध्ये शिवसैनिकांनी एकत्र येत एकनाथ शिंदेच्या यांच्या बंडाचा निषेध नोंदवला.
तसेच, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिंदे यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी बॅनर लावले आहेत. शिंदे यांच्या घराबाहेर शिवसैनिक शांततेत जमले आहेत.
एकनाथ शिंदे यांची गुवाहाटीत बैठक
बंडखोर एकनाथ शिंदे त्यांच्यासह बंडात सामील असलेल्या आमदारांची गुवाहाटीत बैठक घेत आहेत. गुवाहाटीतील रेडिसन हॉटेलमध्ये शिंदे ४० आमदारांसोबत आहेत. येथे पार पडणाऱ्या बैठकीत शिंदे ठाकरे सरकारला पाठिंबा द्यायचा की पक्षाला रामराम ठोकायचा, याबाबत निर्णय घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यास महाविकास आघाडी सरकारवर मोठं संकट कोसळणार आहे.
बुधवारी सकाळी एकनाथ शिंदे आमदारांसह सूरत येथून गुवाहाटी येथे पोहचेले. यावेळी भाजपच्या काही नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही शिंदे यांची भेट घेतली.