Tue. Jun 28th, 2022

बंडखोरांना शिवसेनेचा शेवटचा इशारा

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघडी सरकारवर मोठं संकट कोसळलं आहे. कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अशातच, बंडखोर आमदारांना शिवसेनेने शेवटचा इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना शिवसेना पक्षाच्यावतीने पत्र पाठवण्यात आले आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद (व्हीप) सुनील प्रभु यांनी हे पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवलं आहे. बुधवारी सायंकाळी शिवसेना आमदारांची विधिमंडळ बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीसाठी ५ वाजेपर्यंत मुंबईत या अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पत्राद्वारे शिवसेनेने बंडखोर आमदारांना दिला आहे.

बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. शिवसेना आमदारांच्या विधिमंडळ बैठकीला उपस्थित रहा अन्यथा अपात्र ठरवू, असं पत्र बंडखोर आमदारांना शिवसेना पक्षाकडून पाठवण्यात आलं आहे. तसेच बैठकीला उपस्थित राहिला नाहीत, तर थेट कारवाई करणार असल्याचं आमदारांना ठणकावून सांगण्यात आलं आहे.

तर, दुसरीकडे बंडखोर एकनाथ शिंदे त्यांच्यासह बंडात सामील असलेल्या आमदारांची गुवाहाटीत बैठक घेत आहेत. गुवाहाटीतील रेडिसन हॉटेलमध्ये शिंदे ४० आमदारांसोबत आहेत. येथे पार पडणाऱ्या बैठकीत शिंदे ठाकरे सरकारला पाठिंबा द्यायचा की पक्षाला रामराम ठोकायचा, याबाबत निर्णय घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यास महाविकास आघाडी सरकारवर मोठं संकट कोसळणार आहे.

मविआ सरकार धोक्यात येण्याची शक्यता?

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारला आहे. तर दुसरीकडे भाजपची संख्याबळ ११३ आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा असून बहुमताचा आकडा १४५ आहे. शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपाला पाठिंबा दिल्यास भाजपाला बहुमत मिळेल. आणि महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.