Jaimaharashtra news

शिवसेनेचा आज ५५वा वर्धापन दिन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना या पक्षाचा आज ५५वा वर्धापन दिन आहे. राज्यात कोरोनाचे संकट पूर्णपणे ओसरलेले नाही. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकारी यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाला कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक उपस्थितीत असतात. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. त्यामुळे यंदाही सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा सोहळा साधेपणाने साजरा केला जाणार आहे.शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, जनजागृतीचे कार्यक्रम आणि अन्य समाजोपयोगी उपक्रम ठिकठिकाणी राबवले जाणार आहेत.

तसेच ‘शिवसेनेची प्रत्येक शाखा आणि मध्यवर्ती कार्यालयात निवडक शिवसैनिकांच्या उपस्थितीत सकाळी १०:३० वाजता भगवा ध्वज फडकवण्यात यावा. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात यावी. मात्र शिवसैनिकांनी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून वर्धापन दिन साजरा करावा’, अशी सूचना शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.

Exit mobile version