Fri. Jan 28th, 2022

‘रावणाच्या लंकेत बुरखाबंदी, रामाच्या अयोध्येत कधी?’ ‘सामना’मधून सवाल

कोलंबोतील दहशतवादी हल्ल्यानंतर श्रलंकेमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव बुरखाबंदी आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपवर शरसंधान साधत ‘रामाच्या अयोध्येत बुरखाबंदी कधी करणार?’ असा सवाल केला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’मधून दहशतवादी कारवाईंवर नियंत्रणाच्या दृष्टीने भारतातही बुरखाबंदी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘जम्मू-काश्मिरला दहशतवादाने ग्रासलं आहे. श्रीलंका, फ्रान्स आणि इंग्लंडसारखे देश दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलत आहेत. आपण अशा प्रकारची पावलं कधी उचलणार?’ असा प्रश्न विचारला आहे.

मोदी सरकारने तिहेरी तलाकविरोधात कायदा आणला. आता श्रीलंकेच्या पावलावर पाऊल ठेवून भारतात ‘बुरखा’ आणि ‘नकाब’बंदीचाही निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी ‘सामना’मधून करण्यात आली आहे.

बुरख्याच्या प्रथेबद्दल काय लिहिलंय ‘सामना’मध्ये?

‘मुळात बुरख्याचा इस्लामशी काडीमात्र संबंध नाही व हिंदुस्थानातील मुसलमान अरबस्तानातील समाजव्यवस्थेचे अनुकरण करीत आहेत. अरबस्तानातील वाळवंट व उन्हांच्या तप्त झळांपासून बचाव करण्यासाठी महिलांनी चेहरा झाकून बाहेर पडण्याची प्रथा कधीकाळी पडली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चढतो तेव्हा सायकल, स्कूटरवरून प्रवास करणार्‍या तरुणी चेहर्‍यास ओढणी किंवा रुमाल गुंडाळूनच बाहेर पडतात. पण हे तेवढ्यापुरतेच असते. मात्र ‘नकाब’ किंवा ‘बुरखा’ घालणे हा जणू कुराणाचा आदेश आहे अशा भ्रमात किंवा अंधश्रद्धेत येथील मुसलमान वावरत आहेत. धर्म आणि समाजव्यवस्था यांची गुंतागुंत इस्लाममध्ये झाल्यामुळे सामान्य मुसलमान भांबावून जातो आणि धर्माप्रमाणे समाजव्यवस्थेचे नियम अपरिवर्तनीय नसल्यामुळे त्या नियमात बदल करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला तो आपल्या धर्मावरच घातलेला घाला वाटतो.’ असंही या अग्रलेखात मांडण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *