महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद चिघळला, कोल्हापुरात पडसाद

‘महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर उभे करुन गोळ्या घाला’, असे वादग्रस्त वक्तव्य भीमाशंकर पाटीलने केलं होतं. पाटील यांच्या या वक्तव्यानंतर सीमाप्रश्न चिघळला आहे. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद कोल्हापुरात कोल्हापुरातही उमटले आहेत.
‘कनसे’च्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
या सर्व प्रकरणामुळे मराठी-कानडी वाद चांगलाच पेटला आहे. कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. कोल्हापूर बसस्थानकावर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
शिवसैनिकांकडून कन्नड पाट्यांना काळं फासण्यात आलं आहे.
कोल्हापुरात सुरु असलेला कन्नड सिनेमा ‘अवणे श्रीमनारायन’ युवासैनिकांकडून बंद पाडण्यात आला.
या सर्व प्रकरणाचा परिणाम सार्वजनिक वाहतूक सेवेवरही झाला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील एसटी सेवा शनिवारी मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात आली आहे.
त्यामुळे याचा नाहक त्रास प्रवाशांना भोगावा लागत आहे.
दोन्ही राज्यातील परिस्थिती पाहता पोलिसांनी दोन्ही राज्यांच्या परिवहन विभागाला बस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

तर गाठ शिवसेनेशी – धैर्यशील माने
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का जरी लागला, तर गाठ शिवसेनेशी असेल, असा इशारा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी कनसेला दिला आहे.