Tue. Sep 28th, 2021

रक्षाबंधनाच्या निमित्ताने नात्याचा वेगळा पैलू शोधण्याचा प्रयत्न

मी आत्तापर्यंत नाटक, सिनेमा, सिरीयल, वेबसिरीज अशा सगळ्या माध्यमांमधून मुशाफिरी केली. ‘हम आपके है कौन’ प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या सिनेमातील माझी भाभीची व्यक्तिरेखा आजही लोकप्रिय आहे. या सिनेमाला नुकतीच 25 वर्षं पूर्ण झाली आहेत. माझ्यावर त्यानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होतोय. भारतीय परिप्रेक्ष्यातील नातेसंबंधांचा अतुट धागा ‘हम आपके है कौन’मुळे लोकांना नव्याने गवसला. या सिनेमाने लग्नसराईच्या सोहळ्याचे आयाम बदलले. रंगत वाढवली….

आज या सिनेमाला 25 वर्षं झाली असताना मी ‘Silent Ties’ या शॉर्ट फिल्ममधून लोकांपुढे येतेय. इथेही नातेसंबंधांचे वेगळे पैलू आहेत. कुटुंबवत्सल भाभी नाही, पण मायाळू ताई आहे आणि भारतीय कुटुंबमुल्यांचा अतुट धागा सांभाळत रक्षाबंधनाच्या पारंपरिक सणाचा आयाम बदलण्याची एक हळवी भावनिक असोशी आहे… रक्षाबंधनाच्या काही दिवस आधीच यूट्युबवर आमची ‘सिक्रेट टाईज’ शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि आम्हाला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. आपल्या समलिंगी भावाकडे पाहण्याचा बहिणीचा दृष्टीकोन मांडायचा प्रयत्न या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून केलाय.

भावा बहिणीचं नातं हे कायमच भावनिक पातळीवर वेगळं असतं. रक्षाबंधनाला भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचं आश्वासन देतो. मात्र अनेक प्रसंगांमध्ये बहीणही भावाला वाचवत असतेच की… कधी वडिलांच्या धाकापासून, तर कधी आईच्या रागापासून… बहीणही भावाचं कवच असते. अशाच भावा बहिणीची एक छोटीशी कथा… लहानशा प्रसंगांतून उलगडत जाणारी.

आपला भाऊ कार्यक्रमात साडी नेसून परफॉर्म करायचं ठरवतो, तेव्हा संतापणारी बहीण मी पहिल्या प्रसंगात साकारली. पण नंतर आपल्या भावाला आपणच समजून घ्यायला हवं याची झालेली जाणीव… दोनच प्रसंग, दोनच कलाकार आणि अवघ्या दोन फ्लॅट्समध्ये पार पडलेलं शुटिंग… कमीत कमी बजेटमध्ये अवघ्या 1 दिवसात शॉर्ट फिल्म शूट केली. मात्र या शॉर्ट फिल्ममधून दिला गेलेला संदेश खूप स्ट्राँग आहे. महत्त्वाचा आहे. सई देवधरने या शॉर्ट फिल्मचं लेखन दिग्दर्शन केलंय. तर पलाश दत्ताने माझ्या सोबत काम केलंय.

समलिंगी लोकांसंदर्भातील विषय म्हणजे नेहमी त्यांच्या लैंगिक आयुष्यासंदर्भात भाष्य असतं. मात्र आम्ही आमच्या शॉर्ट फिल्ममध्ये भावा बहिणीच्या नात्यावर फोकस ठेवलाय. संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे ही फिल्म पाहू शकतं आणि विचार करू शकतं.

भावासाठी बहिणीचा पाठिंबा किती महत्त्वाचा असतो, हे या रक्षाबंधनाला ‘Silent Ties’ या शॉर्ट फिल्ममधून आम्ही मांडायचा प्रयत्न केलाय. आपल्या भावाला, आपल्या बहिणीला समजून घ्या… बाकी कुटुंब जरी त्यांच्याविरोधात गेले, तरी त्यांच्या पाठीशी उभे राहून एक भिंतही बना पूलही बना… जेव्हा कुणीच त्यांना समजून घेत नाही, असं त्यांना वाटत असेल, तेव्हा त्यांना ठामपणे आपण सोबत असल्याचं सांगा. त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधनं येणार नाहीत, याची काळजी घ्या आणि त्यांना त्यांचं जीवन दबावांपासून मुक्त करताना रक्षाबंधनाद्वारे नात्याचा ओलावा जपा… सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा आणि रक्षाबंधनाच्या सदिच्छा!

 

शब्दांकन : आदित्य नीला दिलीप निमकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *