Sat. Nov 28th, 2020

‘इतकं भांडवल करायची गरज काय?’, सिंधुताई सपकाळ इंदोरीकरांच्या पाठीशी

कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्यावरून आठवडाभर वाद सुरू आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इंदोरीकरांनी आपल्या विधानाबद्दल दिलगीरही व्यक्त केली आहे. मात्र त्यानंतरही हा वाद सुरूच आहे. आता उंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ उतरल्या आहेत. पुराणातल्या कथा सांगत असताना जर इंदुरीकरांकडून एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल, तर त्याचं इतकं भांडवल करायची गरज काय? असा सवाल सिंधुताईंनी विचारलाय.

काय म्हणाल्या सिंधुताई सपकाळ?

इंदोरीकरांचं योगदान मोठं आहे. त्यांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधन केलंय. त्यांच्यामुळे अनेक तरुण वाममार्गाला जाण्यापासून वाचले आहेत. इंदोरीकर महाराजांनी स्वाभिमानाने जगण्याचा मूलमंत्र दिलाय. जनजागृतीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. अशा व्यक्तीच्या तोंडून कीर्तन करताना एखादं वावगं विधान गेलं, तर त्याचं इतकं भांडवल व्हायला नको. इंदोरीकरांनी माफी मागितल्यानंतर हा वाद इतका वाढवायची गरज नाही.

‘सम तिथीला स्त्री संग केला की मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यावर मुलगी होते’ असं विधान इंदोरकरांनी एका कीर्तनात केलं होतं. या विधानावरून मोठा वाद ओढावला. त्यानंतर वारकरी मंडळ तसंच संभाजी भिडे आणि भाजपच्या काही नेत्यांनी इंदोरीकरांना पाठिंबा दर्शवला. तर अनेक महिला संघटनांनी इंदोरीकरांवर टीकेची झोड उठवली. उद्विग्न होऊन इंदोरीकरांनी आता आपण कीर्तनं सोडून शेती करू असं म्हटलं होतं. मात्र सिंधुताईंनी इंदोरीकरांनी कीर्तन बंद करू नये, असं म्हटलंय. एखादं वाक्य चुकलं असेल, तर आपण चुकलो असं मानून इंदोरीकरांनी पुढे कीर्तन चालू ठेवावं, असा सल्ला सिंधुताईंनी इंदोरीकरांना दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *