Tue. Jul 27th, 2021

औरंगाबादमध्ये ‘sky bus’ होणार सुरु

मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरातील मेट्रोपाठोपाठ औरंगाबाद शहरामध्ये Sky bus सुरु होणार आहे. औरंगाबाद शहरातील वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी ही स्काय बस असणार आहे. या स्काय बसच्या कामाचा DPR तयार करण्यासाठी महानगरपालिकेने सुरुवात केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरातल्या मेट्रोपाठोपाठ आगामी काळात औरंगाबादमध्ये स्काय बस धावणार आहे.

स्काय बस सुरु करण्याची योजना –

मराठवाड्याची राजधानी असलेलं औरंगाबाद शहर हे पर्यटन आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे.

शहराच्या विस्तारासोबत वाढलेली लोकसंख्या आणि त्यासोबत वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीवर मोठा ताण पडला आहे.

गर्दीच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी स्काय बस सुरु करण्यासाठी महापालिकेने सुरुवात केली आहे.

स्काय बसचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्यासाठी महापालिकेने तातडीने 50 लाख रुपयांची तरतूद केली आहे. डीपीआर तयार करण्याचे काम शासनमान्य वॅपकॉस कंपनीला देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

स्काय बसची सुरुवात कुठल्या स्थानकांवरुन होणार ? 

औरंगाबाद शहरातील 15 किलोमीटरच्या परिघात स्काय बसचे कार्यक्षेत्र असणार आहे.

शहरातील मुख्य भागात असलेल्या शहागंज, टीव्ही सेंटर, बसस्थानक, रेल्वेस्टेशन या भागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

मेट्रो रेल्वेला पर्याय असणारी स्काय बसची सेवा ही प्रदूषण मुक्त प्रवासासाठी फायदेशीर ठरणार आहे.

बस प्रवासापेक्षा स्काय बसचा प्रवास स्वस्त असणार आहे, असा महापालिकेचा दावा आहे.

900 कोटींचा हा प्रकल्प असून तीन वर्षांत तो पूर्ण करण्यात येणार आहे.

मात्र, नागरिकांनी या स्काय बसला विरोध केला आहे.

आधी शहर बस सेवा सुरु करा अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

हा केवळ निवडणुकीचा फंडा असल्याचा आरोपही औरंगाबादकरांनी केली आहे.

पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर ही सेवा चालवली जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या स्काय बसच्या योजनेची घोषणा केल्यानंतर महापालिका तातडीने कामाला लागली आहे. मात्र, महापालिकेची रिकामी तिजोरी या कामाला कसा हातभार लावेल आणि स्काय बस खरच औरंगाबादमध्ये धावेल का असा प्रश्न नागरिकांना पडलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *