Tue. Dec 7th, 2021

गोदावरीच्या काठावरचं स्मार्ट सिटी पुन्हा अडचणीत?

गोदा साक्षरता यात्रेच्या निमित्तानं नाशिकमधे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह आणि पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी गोदावरीची पाहणी केली. यावेळी गोदावरीत झालेलं प्रदुषण त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सुरु असलेले गोदाघाटावरचे कामं हे गोदावरीसाठी धोकादायक असल्याची खंत राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली. मात्र यानिमित्तानं गोदावरीच्या काठावर सुरु असलेलं स्मार्ट सिटीचं काम पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे

‘नमामि गोदा’ फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली गोदावरी यात्रा नाशिकमधे पोहोचली.

यावेळी जलतज्ञ राजेंद्र सिंह आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गोदावरीच्या काठावर जाउन गोदावरीच्या प्रदुषित परिस्थितीची पाहणी केली.

त्याचप्रमाणे गोदावरीच्या काठावर सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांचीही पाहणी त्यांनी केली.

दरम्यान गोदावरीच्या काठावर सुरु असलेले काम गोदावरीसाठी जिवघेणे ठरतील अशी भिती यावेळी जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.

गेल्या काही वर्षांपासुन गोदावरीच्या पाण्यात कंपन्यांचं दुषित पाणी जात असल्याच्या घटना घडत आहे.

यापुढे एक थेंबही दुषित पाणी गोदावरीत जाऊ देणार नाही असं सांगतानाच अशा कंपन्यांना तात्काळ नोटीस बजावल्या जातील असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

स्मार्ट सिटीच्या (Smart City) कामाबाबतही भुजबळांनी सूचना केल्यानं हे काम पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. स्मार्ट सिटीचं काम हे नियमांना धरुनच असून, गोदातटावर असलेल्या ब्लू लाइनमधे कोणतंही सिमेंट काँक्रिटचं बांधकाम होणार नाही अशी ग्वाही यावेळी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या कामांना लागणारा वेळ आणि त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय यामुळे नाशिककर आधीच वैतागलेले असताना, गोदावरीच्या काठावर सुरु असलेल्या कामांमुळे गोदावरीच्या प्रवाहावर परिणाम होऊ नये अशीच अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *