कोटींची लूट करणारा निघाला कथित सिनेकलाकार

प्रख्यात मंदिराच्या दानपेटीतील रक्कम आणि ऐवज सवलतीत देण्याचं प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या कथित सिनेकलाकारासह चौकडीला शिळडायघर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केलंय. या टोळीने सर्वसामान्य नागरिकांची तब्बल 1 कोटींची फसवणूक केल्याचं समोर आलंय. या टोळीच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.
मोबाईल तंत्रज्ञानाने अद्ययावत असल्याने या भामट्यांनी विविध राज्यातील तब्बल 253 मोबाईल सिमकार्डचा वापर गुन्हे करण्यासाठी केला होता.
यातील एकजण तोतया पोलीसही आहेत.
या चारही आरोपीना ठाणे न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कुर्ला येथील चामड्याचा (लेदर) व्यवसाय करणारे निषाद शेख यांना कमल आणि चेतन या व्यक्तींनी कल्याण फाटा येथे बोलवलं.
योग्य दरात लेदर देतो असे सांगून 2 लाख रूपये स्वीकारले आणि गोदाम दाखवण्याचा बहाणा करून पळ काढला.
याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर शिळडायघर पोलीसांनी तपास सुरू केला.
कमल आणि चेतन हे दोघे मोबाईल एक्सपर्ट होते.
तसंच, ते वेळोवेळी आपले मोबाईल आणि सीम बदलत होते.
अशा परिस्थितीत पोलीसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून या दोघांचे मोबाईल नंबर हस्तगत केले.
त्याआधारे भीमराज मालजी उर्फ चेतन मांजिद, प्रवीण वर्मा उर्फ कमल, मल्लेश डिंगी उर्फ मल्लू आणि चौडप्पा कालोर अशा चौघांना अटक केली.
यातील भीमराज हा सिनेकलाकार असून अनेक टिव्ही मालिकांमध्ये त्याने काम केल्याचा दावा पोलिसांनी केलाय.
तर,मल्लू हा तोतया पोलीस आहे.
हे चौघेही सर्वसामान्य व्यक्ती हेरून त्यांचा विश्वास संपादन करून शिर्डी तसेच सिद्धिविनायक मंदिरांमध्ये गोळा होणारी चिल्लर, सोन्याची बिस्कीटे देण्याचे प्रलोभन दाखवत. त्या बदल्यात कमी रक्कम स्वीकारण्याचा बहाणा करून पैसे घेत होते. तसंच, हा सौदा होत असतानाच पोलीसांचा छापा पडल्याचं भासवून धूम ठोकत असत.
नंतर मिळालेली रक्कम आणि सोन्याची बिस्किटं आदी ऐवज नकली असल्याचे उघड झाल्याने फसवणूक झालेल्या व्यक्तीनी पोलिसात धाव घेतली. या टोळीचे कारनामे उघडकीस आले.
तब्बल एक कोटींची फसवणूक करणाऱ्या या टोळीने आसाम, मध्य प्रदेश आदी राज्यातील 253 मोबाईल सिमकार्डचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 10 मोबाईल फोन, 28 हजारांची रोकड आणि फसवणुकीकरता वापरण्यात आलेल्या नकली नोटा, नकली सोन्याची बिस्कीटे असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.