जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीने कोल्हापुरात खळबळ

जयप्रभा स्टुडिओची दोन वर्षापूर्वी विक्री झाल्याचे उघड झाले आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या मालकीच्या जयप्रभा स्टुडिओ साडे सहा कोटींनी विकला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीमुळे कोल्हापूरात खळबळ उडाली असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
चित्रपट सृष्टीचे माहेरघर असलेला जयप्रभा स्टुडिओ खाजगी मालकाच्या ताब्यात जाऊ नये यासाठी कोल्हापूरकारांनी मोठा लढा दिला होता. मात्र भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर हा व्यवहार पुढे आल्याने कोल्हापूरकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मुलांनी भागीदारीत हा व्यवहार केल्याचे समोर आले आहे. त्यांनी याबाबत अनभिज्ञ असल्याचे म्हटले असून सरकाने हा स्टुडिओ खरेदी केल्यास त्यांना देण्याची तयारीही दर्शवली आहे.