अभिमानास्पद! तरुणाची वडिलांना अनोखी श्रद्धांजली

खडकवासला येथील तरुणाची वडिलांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. दुर्गम भागातील एक घर सैरऊर्जेने त्याने प्रकाशमय केले आहे .
खडकवासला येथे राहणाऱ्या राज बाळासाहेब सपकाळ या तरुणाने आपले वडील कै. बाळासाहेब सपकाळ यांच्या वर्षश्राद्धाच्या पारंपरिक विधीचा खर्च टाळून माणगाव (तालुका वेल्हे, जिल्हा पुणे) येथे अत्यंत दुर्गम ठिकाणी डोंगरकपारीत राहणाऱ्या कोंडिबा कोकरे यांचं घर सौर विद्युतने प्रकाशमय करून आपल्या वडिलांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.
राज सपकाळ हा तरुण खडकवासला येथे मोबाईल शॉपीचे दुकान चालवतो. दरवर्षी वडिलांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने वेगवेगळे सामाजिक उपक्रम तो करत असतो. यंदा पाचव्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने ज्याठिकाणी अजून वीज पोहोचलेली नाही, अशा दुर्गम ठिकाणी जाऊन एका घरासाठी सौर विद्युत प्रकल्प बसवण्याचं त्याने ठरवलं. पुणे शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या माणगाव-चांदर या वेल्हे तालुक्यातील दुर्गम ठिकाणी राहणाऱ्या कोंडिबा कोकरे यांच्याबद्दल त्याला माहिती मिळाली. त्यानुसार प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन सौर विद्युत प्रकल्प बसवून देण्यात आला. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय.