Wed. May 18th, 2022

सोलापुरात संपकारी कर्मचाऱ्याच्या मुलाने केली आत्महत्या

एसटी संपकारी कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. वडिलाने पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. हा दुर्दैवी प्रकार १९ जानेवारी रोजी (बुधवारी) दुपारच्या सुमारास घडला असून सिव्हिल पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

अमर तुकाराम माळी असे आत्महत्या  केलेल्या मुलाचे नाव असून सोलापूरमधील दयानंद महाविद्यालायत अमरने १२वी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. तर त्याचे वडिल तुकाराम माळी एसटी कर्मचारी असून राज्यात सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी आहेत. १९ जानेवारी (बुधवारी) अमरने वडिलांकडे पैशाची मागणी केली. मात्र, ‘माझे काम गेल्या दोन-तीन महिन्यापासून बंद आहे, मला मासिक पगार मिळत नाही, तुला पैसे कुठून देऊ’, असे सांगत वडिलांनी मुलाला पैसे देण्यास नकार देऊन आंदोलनात सहभागी होण्यासाठी घराबाहेर गेले.

त्यानंतर अमरसुद्धा घराबाहेर गेला आणि दुपारच्या सुमारास पुन्हा घरी परतला. अमरची आई आणि त्याची चुलती घरी जेवण करत होते. आईने त्याला जेवणासाठी आग्रह केला, मात्र आराम करतो सांगत अमर स्वत:च्या खोलीत गेला. खोलीत जाऊन बराच वेळ झाला परंतु तो खोलीबाहेर आला नाही. म्हणून आई त्याला आवाज देऊ लागली. मात्र, खोलीतून काही प्रतिसाद आला नाही. अमरने खोली आतून बंद केली होती. आईसह मोठा भाऊसुद्धा अमरला आवाज देऊ लागेल, परंतु खोलीतून प्रतिसाद येत नव्हता. त्यावेळी खोलीच्या खिडकीतून पाहिले असता, अमर साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. अमरच्या मोठ्या भावाने खोलीचा दरवाजा तोडला. अमरला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहता, त्याच्या आईने हंबरडा फोडला. त्यावेळी अमरला लगेचच उपाचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच अमरचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.