सौरव गांगुलीतर्फे दररोज १० हजार लोकांना अन्नदान

टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि आता BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी लॉकडाऊनच्या काळात आपण खरंच दादामाणूस असल्याचं दाखवून दिलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला आहे. अशा परिस्थितीत रोजंदारीवर जगणाऱ्या लोकांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा लोकांसाठी सौरव गांगुली पुढे सरसावले आहे. याआधी सौरव गांगुलीने बेलूर मठाला मोठ्या प्रमाणात तांदूळ दान केलं होतं. आताही कोलकात्याच्या इस्कॉन केंद्राला सौरव गांगुली अन्नदानासाठी मदत करणार आहे.
सौरव गांगुली यांनी या कठीण परिस्थितीत १० हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचं ठरवलं आहे. इस्कॉन केंद्राकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. आम्ही आत्तापर्यंत १० हजार लोकांसाठी दररोज अन्नदानाची व्यवस्था करत आहोत. आता सौरव गांगुली यांनी १० हजार लोकांच्या अन्नदानासाठी आम्हाला मदत केल्यावर आम्ही २० हजार लोकांना मदत करू शकतो, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.