Wednesday, April 22, 2026 11:12:50 PM

Yedeshwari Devi Yatra: येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीच्या यात्रेला उत्साहात सुरुवात; जाणून घ्या 'येडाईच्या परडी'ची परंपरा आणि महत्त्व

तुळजापूरच्या भवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर लोटला आहे.

yedeshwari devi yatra येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीच्या यात्रेला उत्साहात सुरुवात जाणून घ्या येडाईच्या परडीची परंपरा आणि महत्त्व

Yedeshwari Devi Yatra: धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. तुळजापूरच्या भवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर लोटला आहे. या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे 'आईची परडी'. अनेक संत-महंतांनी या परडीला बोधाचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानले असून, या परंपरेला भाविकांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

काय असते 'येडाईची परडी' आणि ती कोणाला येते?
येडेश्वरी देवीची परडी म्हणजे 'देवाचे ताट' मानले जाते. ही परडी परंपरेनुसार कुटुंबातील थोरल्या मुलाकडेच येते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला देवीचा दृष्टांत होतो किंवा जीवनात काही विशिष्ट संकेत मिळतात, तेव्हा देवीचा कौल घेतला जातो. तुळजापूरमध्ये उजवा किंवा डावा हात लावून, तर येरमाळ्यात दगडावर हात ठेवून (गोटा उजवा फिरल्यास) पर्डीचा कौल घेतला जातो. एकदा का पर्डी घरात आली की, दर शुक्रवारी आणि मंगळवारी जोगवा मागावा लागतो. या जोगव्यातून मिळालेल्या पिठाची भाकरी करून ती नैवेद्य म्हणून खाल्ली जाते, अशी ही कडक श्रद्धेची परंपरा आहे.

'येडेश्वरी' नावामागचा पौराणिक इतिहास
येडेश्वरी देवीच्या स्थापनेचा इतिहास थेट प्रभू श्रीरामाच्या काळाशी जोडला जातो. पौराणिक कथेनुसार, वनवासात असताना पार्वती देवीने श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप धारण केले होते. मात्र, श्रीरामांनी ध्यान लावून ओळखले की ही सीता नसून साक्षात आदिशक्ती आहे. त्यावेळी श्रीराम म्हणाले, "अगं आई, तू वेडी आहेस का? मला फसवण्यासाठी रूप घेतलेस?" प्रभू श्रीरामांनी देवीला 'वेडी' (येडी) म्हटल्यामुळे या देवीचे नाव 'येडेश्वरी' पडले, अशी मान्यता आहे.

हेही वाचा - Free Devdarshan : ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! तीर्थयात्रेचे स्वप्न पूर्ण होणार; 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'त सरकार उचलणार इतका खर्च

भक्तीचा उदो-उदो आणि प्राचीन वास्तुकला
येडेश्वरी देवीचे मंदिर बालाघाटाच्या डोंगररांगांमध्ये वसलेले आहे. मंदिराचे प्राचीन बांधकाम पाहता, त्या काळी इतकी भव्य आणि सुबक वास्तू उभारणे हे एक आश्चर्य मानले जाते. यात्रेच्या काळात "आई साहेबांचा उदो-उदो" आणि "येडाईचा उदो-उदो" या जयघोषाने संपूर्ण येरमाळा परिसर दुमदुमून जातो. आराधी आणि भक्त हातामध्ये बोधपरडी घेऊन देवीचा महिमा गातात, ज्यामुळे या यात्रेला एक वेगळेच आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते.
 


सम्बन्धित सामग्री