पंढरपुर: आषाढी एकादशीचा मंत्रमुग्ध उत्सव पंढरपुरात पार पडला. चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी पाहायला मिळाले. रविवारी पहाटे 2:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडली. यंदा, फडणवीसांना सहाव्यांदा महापूजा करण्याचा मान मिळाला. यावर्षी, आषाढी महापूजेचा मान कैलास दामू उगले (वय: 52 वर्ष) आणि कल्पना कैलास उगले (वय: 48) यांना मिळाला आहे. उगले कुटुंब मूळचे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे रहिवासी आहेत. यावर्षी, उगले कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांसह शासकीय पूजेचा मान मिळालेल्या उगले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांनी एक वर्षासाठी मोफत एसटी प्रवास सवलत दिली आहे.
हेही वाचा: आषाढी एकादशीचं विशेष महत्त्व; जाणून घ्या
काय म्हणाले उगले कुटुंब?
'काय बोलावं काही समजत नाही. खूप आनंद झाला आहे. आमचं नंबर लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. गेल्या 15 वर्षांपासून आम्ही वारी करत आहोत', अशी प्रतिक्रिया कैलास उगले यांनी दिली. 'खूप आनंद झाला आहे. फडणवीस साहेबांसोबत विठ्ठलाचं दर्शन होईल आणि पूजा होईल असं वाटलं नव्हतं. फडणवीस साहेबांसोबत विठ्ठलाचं दर्शन झाल्याने आम्ही धन्य झालो', अशी भावनिक प्रतिक्रिया कल्पना उगले यांनी दिली.
हेही वाचा: शिवसेनेच्या 'या' बड्या नेत्याचं शिंदेंना पत्र
फडणवीसांनी केली विठ्ठलाकडे मागणी
'महाराष्ट्राची काळजी घेणं हे माऊलींचं काम आहे. माऊली ही शक्ती देणारी देवता आहे. त्यामुळे, विठ्ठलाकडे माझं एकच मागणं आहे. माऊली ही शक्ती देणारी देवता आहे. आमच्या बळीराजाला चांगलं पीक व्हावं आणि त्याच्या जीवनात आनंदाचे चार क्षण यावे', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी, मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिव्यजा फडणवीस उपस्थित होते.