Friday, March 21, 2025 08:47:13 AM

मुंबईचा 'हा' खेळाडू होणार राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक

यापूर्वी भारताचं प्रशिक्षक पद भूषवलं होतं

मुंबईचा हा खेळाडू होणार राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक

मुंबई: राजस्थान रॉयल्स आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 हंगामासाठी सैराज बहुतुले यांची नवीन विशेष फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करणार आहे. भारताचे माजी फिरकीपटू बहुतुले यांनी बेंगळुरूमधील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) अनेक वर्षे काम केलं आहे. त्यांनी नुकतीच ती जबाबदारी सोडली असून, आता राजस्थान संघात नवी भूमिका स्वीकारणार आहेत. याआधी, त्यांनी 2023 च्या बॉर्डर-गावसकर मालिकेदरम्यान आणि 2024 मध्ये भारताच्या श्रीलंका दौऱ्यात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते, जेव्हा मॉर्नी मॉर्केल यांची नियुक्ती अद्याप निश्चित झालेली नव्हती.

राजस्थान संघात बहुतुले यांच्यासोबत वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून शेन बॉण्ड कार्यरत असतील. भारताने 2024 च्या T20 विश्वचषक जिंकल्यानंतर, राहुल द्रविड यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आणि ते राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाले. तसेच, भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचीही 2025 हंगामासाठी संघात नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, माजी श्रीलंकन क्रिकेटपटू कुमार संगकारा राजस्थान फ्रँचायझीचे क्रिकेट संचालक म्हणून कार्यरत आहेत.

आपली राजस्थान रॉयल्ससोबतची शक्यता जवळपास निश्चित असल्याचे बहुतुले यांनी स्वतः सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, अंतिम निर्णयासाठी काही गोष्टी ठरवायच्या बाकी आहेत. राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा अनुभव त्यांना आधीच आहे आणि त्यांच्या पुनर्भेटीबद्दल बहुतुले उत्सुक आहेत.

"संघासोबतच्या चर्चासत्रे सुरू आहेत आणि मी या भूमिकेसाठी जवळपास निश्चित झालो आहे. काही महत्त्वाचे तपशील अजून ठरायचे आहेत, पण मी या नव्या जबाबदारीसाठी उत्सुक आहे. तसेच, राहुलसोबत पुन्हा काम करण्यासाठी मी खूप आनंदी आहे. 2023 च्या बॉर्डर-गावसकर मालिकेदरम्यान भारतीय संघात फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मला संधी मिळाली, त्यावेळी राहुलनेच मला संघात आणले होते. श्रीलंका दौऱ्यातही मी त्यांच्या प्रशिक्षक दलाचा भाग होतो, त्यामुळे आमची ही पुनर्भेट विशेष असणार आहे," असे बहुतुले यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री