IPL 2026: आयपीएल 2026 मध्ये 'चेपॉक'च्या ऐतिहासिक मैदानावर आज धावांचे तुफान पाहायला मिळाले. लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) ऑस्ट्रेलियन फलंदाज जोश इंग्लिसने चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) गोलंदाजांचा अक्षरशः धुवा उडवत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. केवळ 17 चेंडूत अर्धशतक ठोकून इंग्लिसने लखनौच्याच निकोलस पूरनचा मोठा विक्रम मोडीत काढला.
निकोलस पूरनला टाकले मागे
यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्ससाठी सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम निकोलस पूरनच्या नावावर होता. पूरनने 2025 मध्ये हैदराबादविरुद्ध 18 चेंडूत फिफ्टी पूर्ण केली होती. मात्र, आज इंग्लिसने अवघ्या 17 चेंडूत हे अंतर पार करत पूरनला मागे टाकले आहे. या वादळी खेळीत त्याने 6 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार खेचले.
चेपॉकच्या इतिहासात पहिल्यांदाच!
एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) आजवर अनेक दिग्गज फलंदाज खेळले, पण आयपीएलच्या इतिहासात येथे 20 पेक्षा कमी चेंडूत अर्धशतक झळकावणारा जोश इंग्लिस हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने पहिल्या 6 षटकांत म्हणजेच पॉवरप्लेमध्येच 25 चेंडूत नाबाद 77 धावा कुटल्या, ज्यामुळे लखनौने 20 षटकांत 203 धावांचा डोंगराएवढा टप्पा गाठला.
पावरप्लेमधील 'तांडव'
जोश इंग्लिसच्या या खेळीची वैशिष्ट्ये:
वेगवान अर्धशतक: केवळ 17 चेंडू.
एकूण धावसंख्या: 33 चेंडूत 85 धावांची आक्रमक खेळी.
पॉवरप्ले रेकॉर्ड: पहिल्या 6 षटकांत सर्वाधिक वैयक्तिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो आता चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
बाउंड्रीजचा पाऊस: केवळ पन्नास धावा पूर्ण होईपर्यंत त्याने 10 वेळा चेंडू सीमापार धाडला होता.
हेही वाचा - ICC Women's T20 World Cup: T20 विश्वचषकासाठी आणखी एक संघ सज्ज! भारत आणि पाकिस्तानविरुद्धही रंगणार अटीतटीचा सामना
लग्नामुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकलेला हा ऑस्ट्रेलियन 'वादळ' संघात परतताच लखनौची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. इंग्लिसच्या या ऐतिहासिक खेळीने चेन्नईच्या चाहत्यांनाही थक्क केले असून, लखनौसाठी हा विजय मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.