Thursday, November 13, 2025 02:09:30 PM

Sunrisers Leeds : हंड्रेड लीगमध्ये मोठा बदल!; नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघ आता ओळखला जाणार 'या' नावानं

हा बदल 2026 च्या हंगामापूर्वी करण्यात आला असून, लीगमधील तीन फ्रँचायझींच्या नावात बदल होण्याची ही पहिली पायरी आहे.

sunrisers leeds  हंड्रेड लीगमध्ये मोठा बदल नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघ आता ओळखला जाणार या नावानं

SRH Rename Northern Superchargers as Sunrisers Leeds: हंड्रेड लीगमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. लीड्सस्थित नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघाचं अधिकृत नाव आता ‘सनरायझर्स लीड्स’ असं करण्यात आलं आहे. हा बदल 2026 च्या हंगामापूर्वी करण्यात आला असून, लीगमधील तीन फ्रँचायझींच्या नावात बदल होण्याची ही पहिली पायरी आहे. भारतीय मीडिया समूह सन ग्रुप, जो आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद आणि दक्षिण आफ्रिकेतील सनरायझर्स ईस्टर्न केप या संघांचा मालक आहे, त्यांनी याच वर्षी लीड्स फ्रँचायझीचं तब्बल 100 दशलक्ष पौंड मूल्याचं अधिग्रहण केलं. 

यॉर्कशायर क्लबने त्यांच्या 51 टक्के शेअर्ससह ईसीबीचे 49 टक्के शेअर्स विकल्यानंतर, सन ग्रुप आता संघाचा एकमेव मालक बनला आहे. यूकेमधील कंपनीज हाऊसमध्ये दाखल झालेल्या कागदपत्रांनुसार 'नॉर्दर्न सुपरचार्जर्स' हे नाव अधिकृतरीत्या बदलून 'सनरायझर्स लीड्स' हे नवीन नाव स्वीकारण्यात आलं आहे.

पुढचे बदलही निश्चित

हंड्रेड लीगमधील इतर दोन संघांमध्येही नावबदल होणार आहेत. मँचेस्टर ओरिजिनल्स आता मँचेस्टर सुपर जायंट्स म्हणून ओळखले जाणार आहे. तर ओव्हल इनव्हिन्सिबल्स या संघाचे नाव रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सहभागानंतर एमआय लंडन होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Ranji Trophy: मुंबईचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालची जबरदस्त कामगिरी! रणजी ट्रॉफीत पार केला 1000 धावांचा टप्पा

यॉर्कशायरचे सीईओ संजय पटेल यांची प्रतिक्रिया

या करारामुळे क्लबच्या आर्थिक स्थितीत मोठा फरक पडला आहे. आम्ही कर्जफेड करून स्थिर भविष्याकडे वाटचाल करतो आहोत, अशी प्रतिक्रिया यॉर्कशायरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पटेल यांनी दिली.

हेही वाचा - Sikandar Sheikh Bail: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला मोठा दिलासा! पंजाब पोलिसांच्या अटकेनंतर चौथ्या दिवशी जामीन मंजूर

संघांची अलीकडची कामगिरी

नॉर्दर्न सुपरचार्जर्सच्या महिला संघाने यंदाच्या हंगामात हंड्रेडचा किताब जिंकला होता, तर पुरुष संघ एलिमिनेटर फेरीत बाद झाला. पुढील वर्षी संघ नवीन नाव, नवीन कोच आणि नवीन ऊर्जा घेऊन मैदानात उतरणार आहे. इंग्लिश क्रिकेट बोर्ड (ECB) ने नुकतीच घोषणा केली आहे की, पुढील सिझनपासून हंड्रेडमध्ये ड्राफ्ट प्रणालीऐवजी लिलाव प्रणाली लागू होणार आहे. प्रत्येक संघात एक अतिरिक्त परदेशी खेळाडू ठेवण्याची मुभा असेल, आणि खेळाडूंच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. 2026 चा हंगाम 21 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान पार पडेल.
 


सम्बन्धित सामग्री