IPL 2026 Schedule: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या 'आयपीएल 2026' (IPL 2026) च्या आयोजनाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्पर्धेच्या सुरुवातीच्या तारखेत बदल करण्याचे संकेत दिले असून, आता ही स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा 2 दिवस उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.
26 मार्चचा मुहूर्त हुकणार?
यापूर्वी आयपीएल 2026 ची सुरुवात 26 मार्चपासून होईल, असे गृहीत धरले जात होते. 8 मार्चला टी-20 विश्वचषक संपल्यानंतर 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आयपीएलचा थरार सुरू होणार होता. मात्र, ताज्या माहितीनुसार आता ही स्पर्धा 28 किंवा 29 मार्च रोजी सुरू होऊ शकते. बीसीसीआयने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी, अंतर्गत पातळीवर या हालचालींना वेग आला आहे.
शनिवार-रविवारचे गणित आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद
तारखेत बदल करण्यामागे 'विकेंड'चे लॉजिक असल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयला पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात 'व्ह्यूअरशिप' मिळवायची आहे. 28 मार्चला शनिवार तर 29 मार्चला रविवार आहे. पहिल्याच सामन्याला प्रेक्षकांची मोठी गर्दी मिळावी, या उद्देशाने बीसीसीआय रविवारच्या (29 मार्च) मुहूर्तावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. मिनी लिलावावेळी फ्रँचायझींना 31 मे ही फायनलची तारीख सांगण्यात आली होती, त्यात बदल होण्याची शक्यता कमी आहे.
निवडणुकांचे सावट आणि वेळापत्रकाचा पेच
केवळ प्रेक्षकांचा प्रतिसादच नाही, तर आगामी विधानसभा निवडणुका हे देखील या बदलामागचे एक प्रमुख कारण मानले जात आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मतदानाच्या तारखा आणि आयपीएलचे सामने एकाच वेळी येऊ नयेत, यासाठी बीसीसीआय अत्यंत सावधगिरीने पावले उचलत आहे.
हेही वाचा - Rinku Singh: भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का! वडिलांच्या निधनामुळे रिंकू सिंग वेस्ट इंडिजविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याला मुकणार
मार्चच्या पहिल्या आठवड्यात घोषणा
निवडणूक आयोगाच्या तारखांची वाट न पाहता, बीसीसीआय मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्राथमिक वेळापत्रक जाहीर करू शकते, ज्यात नंतर परिस्थितीनुसार बदल केले जातील. आयपीएल प्रेमींना आता वेळापत्रकासाठी पुढच्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 29 मार्चला स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा रंगण्याची चिन्हे अधिक गडद आहेत.