Amol Muzumdar Story: महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा बळी घेताच संपूर्ण भारत आनंदात न्हाऊन निघाला. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर मैदानावर धावत आली आणि तिने संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या नमस्कार करून मिठी मारली. तो क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायमस्वरूपी कोरला गेला. हा फक्त विजय नव्हता, तर एका माणसाच्या शांत परंतु ठाम नेतृत्वाचा परिणाम होता. अमोल मुजूमदार, ज्यांनी स्वतः कधीच भारताकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही, परंतु, त्यांनी भारताला जागतिक विजेता बनवून दाखवलं आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये मुजूमदार यांनी भारतीय महिला संघाचे सूत्र हातात घेतले, तेव्हा संघात मतभेद, गटबाजी आणि अस्वस्थता होती. गेल्या पाच वर्षांत संघात अंतर्गत कलह आणि अस्थिरता होती. मुजूमदार यांनी पहिले काम केले ते म्हणजे विश्वास आणि आदर पुनर्स्थापित करणे. त्यांनी खेळाडूंशी नातं निर्माण केलं, त्यांचं मनोबल वाढवलं आणि मैदानाबाहेरील विषारी वातावरण साफ केलं. याचाच परिणाम म्हणजे आजचा हा सुवर्ण क्षण.
हेही वाचा - Jay Shah and Harmanpreet Kaur Video : संस्कार! हरमनप्रीत कौर जय शाहांच्या पडली पाया, पण पुढे असं काही घडलं की...
भारतासाठी न खेळलेला पण इतिहास रचलेला क्रिकेटपटू
मुंबईसाठी रणजी पदार्पणात द्विशतक झळकावणारा अमोल मुझुमदार हा देशांतर्गत क्रिकेटमधील एक चमकता तारा होता. 20 हंगामांमध्ये त्याने तब्बल 11.167 धावा केल्या आणि 30 शतके झळकावली. पण सचिन, द्रविड, गांगुली यांच्या काळात भारतीय संघात त्याला कधी जागा मिळाली नाही. तरीही त्याने क्रिकेटपासून पाठ फिरवली नाही. उलट कोचिंग हा त्याचा पुढचा अध्याय ठरला.
हेही वाचा - World Cup Prize Money : विश्वविजेत्या टीम इंडियाने मोठी बक्षीस रक्कम जिंकून रचला इतिहास, किती मिळाले पैसे?
कोच म्हणून नवे करिअर
निवृत्तीनंतर मुजूमदार यांनी कोचिंग क्षेत्रात पाऊल टाकले. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये त्यांनी युवा खेळाडूंना मार्गदर्शन केलं. तसेच राजस्थान रॉयल्स आणि दक्षिण आफ्रिका संघाचे फलंदाजी सल्लागार म्हणूनही ते काम पाहत होते. परंतु महिला संघाचं प्रशिक्षण घेणं हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. मात्र, आज त्यांनी ते यशस्वीपणे पार केलं आहे.
विजयानंतर मुजूमदार काय म्हणाले?
विजयानंतर बोलताना मुजूमदार म्हणाले, 'हे यश माझं नाही, हे खेळाडूंचं आहे. त्यांनी अविश्वसनीय मेहनत घेतली. आम्ही प्रत्येक पराभवाला पराभव म्हणून नव्हे, तर शिकवण म्हणून घेतलं. शेवटी आम्ही विश्वविजेते झालो!' त्यांनी शेफाली वर्माचं विशेष कौतुक केलं. ती मूळ संघात नव्हती, पण जखमी खेळाडूच्या जागी खेळून ती उपांत्य आणि अंतिम सामन्यात चमकली. शेफालीची कामगिरी जादुई होती. ती आली आणि तिने खेळाची दिशा बदलली, असंही मुजूमदार यांनी नमूद केलं. दरम्यान, 1983 मध्ये कपिल देव यांनी पुरुष संघाला विश्वचषक दिला होता आणि आता 2025 मध्ये अमोल मुजूमदार यांनी महिला संघाला तोच अभिमान दिला आहे. त्यांनी स्वतः खेळाडू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले नाही, पण कोच म्हणून भारताचा झेंडा सर्वाधिक उंचावर फडकवला.