Vinesh Phogat: भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिने कुस्तीच्या आखाड्यात पुनरागमन करण्यापूर्वी एक अत्यंत खळबळजनक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. रविवारी (3 मे 2026) विनेशने थेट केंद्र सरकारला इशारा दिला असून, गोंडा येथे होणाऱ्या 'नॅशनल ओपन रँकिंग स्पर्धे'दरम्यान तिच्यासोबत किंवा तिच्या संघासोबत काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला पूर्णपणे भारत सरकार जबाबदार असेल, असे ठामपणे सांगितले आहे. सुमारे 18 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर ती मॅटवर परतत असताना, या स्पर्धेच्या निष्पक्षतेवर तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पक्षपाती पंचगिरी आणि ब्रिजभूषण यांचा प्रभाव
विनेशने आपल्या आरोपात म्हटले आहे की, ही स्पर्धा ज्या ठिकाणी आयोजित केली जात आहे, तो भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांचा बालेकिल्ला आहे. तिने संशय व्यक्त केला आहे की, "या स्पर्धेचा निकाल ब्रिजभूषण यांच्या जवळच्या व्यक्तींकडून प्रभावित केला जाऊ शकतो. मॅट चेअरमन कोण असेल, पंच कोणाची नियुक्ती करतील आणि गुण कसे दिले जातील, या सर्व गोष्टींवर त्यांचे नियंत्रण असू शकते." विनेशने माध्यमांना आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून कामात पारदर्शकता राहील.
"मी त्या 6 पीडितांपैकी एक आहे"
यावेळी विनेशने प्रथमच अत्यंत उघडपणे आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ती म्हणाली, "ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा खटला दाखल करणाऱ्या 6 महिला कुस्तीपटूंपैकी मी एक प्रमुख तक्रारदार आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात असून साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. अशा परिस्थितीत, ज्या ठिकाणी आरोपीचा प्रचंड प्रभाव आहे, तिथे जाऊन स्पर्धा करणे माझ्यासाठी प्रचंड मानसिक दबावाचे आहे." सर्वोच्च न्यायालयाच्या पीडित संरक्षण मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचेही तिने यावेळी नमूद केले.
सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी
विनेशने सरकार आणि क्रीडा मंत्रालयावरही गंभीर ताशेरे ओढले आहेत. तिने आरोप केला की, प्रशासन केवळ 'प्रेक्षकाच्या भूमिकेत' असून त्यांनी ब्रिजभूषण यांना 'संपूर्ण मोकळीक' (Carte Blanche) देऊन ठेवली आहे. तिने स्पष्ट केले की तिला कोणत्याही विशेष वागणुकीची अपेक्षा नाही, तर केवळ 'लेव्हल प्लेइंग फील्ड' (समान संधी) हवी आहे. खेळाडूंच्या मेहनतीचे योग्य प्रतिबिंब निकालात उमटावे, हीच तिची एकमेव मागणी आहे.
हेही वाचा - Rajasthan Royals Acquisition: IPL मध्ये सर्वात मोठा व्यवहार; 15,660 कोटींना झाला करार, 'राजस्थान रॉयल्स'चा नवा मालक कोण?
वजनी गटात बदल आणि पुढील आव्हान
विनेश फोगट या स्पर्धेत 57 किलो वजनी गटात आपले नशीब आजमावणार आहे. यापूर्वी तिने 50 किलो आणि 53 किलो वजनी गटांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत आणि मानसिक दडपणाखाली ती आपली 100 टक्के कामगिरी करू शकेल का, याबद्दल तिने शंका व्यक्त केली असली तरी, देशासाठी पुन्हा एकदा पदक जिंकण्याची तिची इच्छा कायम आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर क्रीडा मंत्रालय आणि कुस्ती महासंघ काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.