Tuesday, November 18, 2025 10:00:57 PM

Rohit Sharma Reaction: भारतीय महिला संघ विश्वविजेता ठरताच हिटमॅनचे डोळे पाणावले; सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्हायरल

महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत ऐतिहासिक विजेतेपद मिळवलं.

rohit sharma reaction भारतीय महिला संघ विश्वविजेता ठरताच हिटमॅनचे डोळे पाणावले सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्हायरल

Rohit Sharma Reaction: भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 च्या महिला वनडे विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजेतेपद आपल्या नावे केलं. या विजयामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात भारताने दमदार फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर 52 धावांनी सामना जिंकत महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण क्षण नोंदवला.

सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 298 धावा केल्या. शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी सुरुवातीला 104 धावांची ठोस भागीदारी करत संघाला मजबूत पाया दिला. त्यानंतर मधल्या फळीनेही संयमी खेळ केला. गोलंदाजीत दीप्ती शर्माने चमकत 5 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे आफ्रिकेचा डाव 246 धावांवर आटोपला आणि भारताला प्रतिष्ठेचा विश्वविजय मिळाला.

या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गज मैदानात उपस्थित होते. त्यात हिटमॅन देखील सामील होता. अंतिम क्षणी हरमनप्रीत कौरने झेल पकडताच स्टेडियममध्ये जल्लोष उसळला आणि त्या क्षणी रोहित शर्मा उभा राहून टाळ्या वाजवत हा क्षण अनुभवताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव आणि डोळ्यात भावुकतेची चमकही कॅमेऱ्यांनी टिपली. त्याची ही खास प्रतिक्रिया सोशल मिडीयावर खूप व्हायरल होतं आहे. चाहते त्यावर कमेंट्स करत म्हणत आहेत 'मुलींनी रोहितचं स्वप्न पूर्ण केलं!'

कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी हा विजय विशेष आहे. कारण तिने अनेक आयसीसी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे, पण प्रत्येकवेळी ट्रॉफी हातून निसटली. 2009 पासून आत्तापर्यंत अनेक वेळा तिने एकदिवसीय व टी-20 वर्ल्ड कप खेळला, पण सतत निराशा आली. त्या सर्व अनुभवांचा सार तिच्या नेतृत्त्वाखाली काल प्रत्यक्ष यशात बदलताना दिसलं.

भारतीय क्रिकेटसाठी हा क्षण केवळ एक विजय नव्हे, तर एक मोठा टप्पा आहे. महिला क्रिकेट आता खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात उभं राहत आहे. या विजयानंतर टीमचा आत्मविश्वास वाढणारच आहे आणि भारतीय महिला क्रिकेटला नवी ओळख व नवा उंचावलेला दर्जा मिळेल, असा विश्वास क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत.


सम्बन्धित सामग्री