2 मे रोजी चेन्नईच्या एम. ए. चिंबरम मैदानावर पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यानंतर जवळपास मुंबईचे यंदाच्या हंगामातून बाहेर पडणे निश्चित झाले आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हे संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले होते. दरम्यान चेन्नईने दोन्ही सामन्यात मुंबईचा धुव्वा उडवला आहे. मुंबई इंडियन्सने चेन्नई समोर ठेवलेल्या 160 धावांचे आव्हान पुर्ण करत चेन्नईने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अव्वल कामगिरी बजावत मुंबईचा एकतर्फी फरकाने पराभव केला. चेन्नईने 18.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. या विजयासह चेन्नईने प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान कायम ठेवले आहे, तर मुंबईचा यंदाच्या हंगामातील प्रवास इथेच संपल्याचे दिसत आहे.
दरम्यान सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून मुंबईच्या पलटणने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुंबईकडून फलंदाजीसाठी नमन धीरने 37 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या, तर रायन रिकल्टनने 24 चेंडूंमध्ये 37 धावा केल्या. त्याचसोबत सूर्यकुमार यादवने 21 धावा, तर कर्णधार हार्दिक पांड्याने 19 धावा केल्या. यादरम्यान नमन धीर याचा अपवाद वगळता मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली केली. नमनने सर्वाधिक धावा केल्या. मुंबईसाठी फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला, तर इतर खेळाडूंना 10 चा आकडा देखील गाठता आला नाही. तसेच गोलंदाजांमध्ये मुंबईसाठी जसप्रीत बुमराह आणि अल्लाह गजनफर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. अशा प्रकारे मुंबईने चेन्नईसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
हेही वाचा- MI vs CSK: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर; जाणून घ्या कधी होणार पुनरागमन
मुंबईने दिलेले आव्हान पुर्ण करण्यासाठी चेन्नईकडून सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेले कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन या दोघांनी चांगली सुरुवात केली. मात्र यावेळी संजू सॅमसनला मोठी खेळी खेळता आली नाही. त्याने 9 चेंडूंमध्ये 11 धावा केल्या. तर उर्विल पटेल याने 2 चौकार आणि 2 षटकार लगावत 12 चेंडूंमध्ये 24 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि कार्तिक शर्मा या दोघांनी 75 बॉलमध्ये नाबाद 98 धावांची भागीदारी करत चेन्नई सुपर किंग्सला 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला.
यावेळी ऋतुराजने 48 बॉलमध्ये 2 षटकार आणि 5 चौकारासह नाबाद 67 धावा केल्या. तर कार्तिकने 40 बॉलमध्ये 3 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद54 रन्स केल्या. तसेच गोलंदाजांमध्ये अंशुलं कंबोज याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. नूर अहमद याने 2 बळी घेतले. तर जेमी ओव्हरटन आणि रामकृष्ण घोष या दोघांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. यासह मुंबईचा हा या मोसमातील 9 सामन्यांत सातवा पराभव ठरला. या पराभवाचा फायदा चेन्नईला झाला आहे. चेन्नईसाठी उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा जिवंत आहेत. तर मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना मिळवून उर्वरित पाच सामने जिंकणे आवश्यत होते. मात्र पराभवामुळे प्लेऑफचे दरवाजे मुंबईसाठी जवळपास बंद झाले आहेत.