PM Modi Meets Indian Women Cricket Team: नवी दिल्लीतील लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला क्रिकेट विश्वविजेत्या भारतीय संघाची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या भेटीत त्यांनी संघाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन करत देशभरातील प्रत्येक नागरिकाला तुमच्याबद्दल अभिमान वाटतो, असं सांगितले. पंतप्रधानांनी संघाच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक करत म्हटले, सलग पराभवानंतर ज्या जिद्दीने तुम्ही पुनरागमन केले, तीच खरी भारताची ओळख आहे. संघाने पंतप्रधानांना सर्व खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या असलेली विशेष जर्सी भेट दिली. त्यावर 'Champion India' अशी अक्षरे कोरलेली होती.
दरम्यान, कर्णधार हरमनप्रीत कौरने हसत सांगितले, 2017 मध्ये आम्ही तुम्हाला भेटलो होतो, पण तेव्हा ट्रॉफी नव्हती. आता आम्ही ती घेऊन आलो आहोत, त्यामुळे अशा भेटी पुन्हा पुन्हा व्हाव्यात असं वाटतं. तथापी, स्मृती मानधनाने सांगितले, पंतप्रधान नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देतात. महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्यात त्यांच्या प्रेरणेचा मोठा वाटा आहे.
हेही वाचा - Rising Stars Asia Cup: रायझिंग स्टार्स आशिया कपसाठी श्रीलंकेकडून संघ जाहीर; दुनिथ वेलालागेकडे सोपवण्यात आली कमान
पंतप्रधानांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालं - दीप्ती शर्मा
तथापी, अष्टपैलू दीप्ती शर्माने आठवण करून दिली की, 2017 मध्ये पंतप्रधानांनी आम्हाला मेहनत करत राहण्याचा सल्ला दिला होता. आज आम्ही जेव्हा ट्रॉफी घेऊन आलो, तेव्हा वाटलं की तेच स्वप्न आता सत्यात उतरलं. संभाषणादरम्यान, पंतप्रधान मोदींनी दीप्तीच्या ‘जय श्री राम’ इंस्टाग्राम पोस्ट आणि हनुमानाच्या टॅटूचा उल्लेख करत तिच्या श्रद्धेचे कौतुक केले. दीप्ती म्हणाली, मला त्यातून शक्ती आणि प्रेरणा मिळते.
हेही वाचा - India vs South Africa: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा; ऋषभ पंत आणि आकाशदीप संघात परतले
पंतप्रधानांचा ‘फिट इंडिया’ संदेश
पंतप्रधान मोदींनी महिला क्रिकेटपटूंना ‘फिट इंडिया’ चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, 'खेळ केवळ विजयासाठी नाही, तर आरोग्य आणि आत्मविश्वासासाठीही असतो. त्यांनी खेळाडूंना त्यांच्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचे आवाहन केले, जेणेकरून नव्या पिढीलाही क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळेल. तथापी, यावेळी क्रांती गौरने सांगितले की तिचा भाऊ पंतप्रधान मोदींचा मोठा चाहता आहे. पंतप्रधानांनीही हसत तिच्या कुटुंबाला भेटीचे खुलं आमंत्रण दिलं. थोडक्यात महिला विश्वविजेत्यांसोबतची पंतप्रधानांची भेट उत्साह, अभिमान आणि आत्मीयतेने भारलेली ठरली. पंतप्रधान आणि महिला क्रिकेट संघाच्या संवादामुळे भारतीय महिला क्रिकेटचा सुवर्ण क्षण आणखी संस्मरणीय बनला.