ICC T20 Rankings: वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात आपल्या बॅटने वादळ निर्माण करणाऱ्या संजू सॅमसनला आता आयसीसीकडून मोठे बक्षीस मिळाले आहे. भारतासाठी 'करो या मरो' असलेल्या सामन्यात संजूने अवघ्या 50 चेंडूत नाबाद 97 धावांची खेळी केली होती. या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर त्याने ताज्या आयसीसी टी20 फलंदाजी क्रमवारीत तब्बल 25 स्थानांची झेप घेतली असून, त्याने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे.
रँकिंगमध्ये मोठी सुधारणा: संजू आता 40 व्या क्रमांकावर
आयसीसी टी20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी संजू सॅमसनला संघात सलामीसाठी पहिली पसंती मानले जात नव्हते. या स्पर्धेत आतापर्यंत तो केवळ 3 सामने खेळला आहे, मात्र तिसऱ्याच सामन्यात त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या खेळीचा थेट फायदा त्याला रँकिंगमध्ये झाला असून, संजू आता 40 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. संजूच्या या प्रगतीसोबतच इशान किशनलाही एका स्थानाचा फायदा झाला असून तो चौथ्या स्थानावर विराजमान झाला आहे.
हेही वाचा - All England Open 2026: बर्मिंगहॅममध्ये तिरंगा फडकला! लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या चिनी खेळाडूला हरवलं
टॉप 10 मध्ये भारतीय फलंदाजांचे वर्चस्व
आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे. पहिल्या 10 फलंदाजांच्या यादीत भारताचे 4 खेळाडू समाविष्ट आहेत:
अभिषेक शर्मा: 874 रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर कायम.
इशान किशन: 783 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर.
तिलक वर्मा: 749 रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर.
सूर्यकुमार यादव: 739 रेटिंगसह सातव्या क्रमांकावर.