Friday, March 13, 2026 01:14:46 PM

T20 World Cup 2026: उपांत्य फेरीत पावसामुळे व्यत्यय आला तर भारत वर्ल्ड कपमधून बाहेर होणार? ICC चे 'हे' नियम जाणून घ्या

पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी, तर दुसरा 5 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी चाहत्यांच्या मनात एकच धाकधूक आहे. जर पाऊस पडला तर काय?

t20 world cup 2026 उपांत्य फेरीत पावसामुळे व्यत्यय आला तर भारत वर्ल्ड कपमधून बाहेर होणार icc चे हे नियम जाणून घ्या

T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषक 2026 आता आपल्या निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या चार बलाढ्य संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी, तर दुसरा 5 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी चाहत्यांच्या मनात एकच धाकधूक आहे. जर पाऊस पडला तर काय? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अशा स्थितीसाठी विशेष नियमावली तयार केली असून, सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही डावांत किमान 10 षटके खेळली जाणे अनिवार्य आहे. सामान्यतः टी-20 सामन्यात 5 षटकांचा नियम असतो, पण बाद फेरीसाठी आयसीसीने हा निकष 10 षटकांचा ठेवला आहे.

राखीव दिवसाची तरतूद; पावसामुळे खेळ थांबला तर पुढे काय?
आयसीसीने दोन्ही उपांत्य सामन्यांसाठी 'राखीव दिवस' (Reserve Day) निश्चित केला आहे. जर नियोजित दिवशी पावसामुळे 10 षटकांचा खेळ होऊ शकला नाही, तर सामना जिथे थांबला होता तिथूनच राखीव दिवशी पुन्हा सुरू केला जाईल. मात्र, दुर्दैवाने राखीव दिवशीही पाऊस पडला आणि किमान 10 षटकांचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही, तर तो सामना रद्द घोषित केला जाईल. अशा परिस्थितीत कोणताही टॉस किंवा सुपर ओव्हर न होता थेट गुणतालिकेच्या आधारे निकाल लावला जाईल.

सामना रद्द झाल्यास भारत आणि न्यूझीलंडला बसणार फटका
जर पावसामुळे उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला, तर नियमानुसार 'सुपर-8' टप्प्यात आपल्या गटात अव्वल स्थानी राहिलेला संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. याचा अर्थ, सामना रद्द झाल्यास दक्षिण आफ्रिका (ग्रुप 'अ' मधील अव्वल) आणि इंग्लंड (ग्रुप 'ब' मधील अव्वल) यांना फायदा होईल. याउलट, आपल्या गटात दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या भारत आणि न्यूझीलंड या संघांचे मोठे नुकसान होईल आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल. त्यामुळे भारतीय चाहत्यांची प्रार्थना हीच आहे की, वानखेडे आणि ईडन गार्डन्सवर पावसाचे सावट नसावे.

हेही वाचा - PCB Fine: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची खेळाडूंवर मोठी कारवाई; 'या' कारणामुळे बाबर, शाहीन अन् सलमानला 50 लाखांचा दंड

उपांत्य फेरीचे वेळापत्रक आणि ठिकाण
दरम्यान, पहिला सेमीफायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात 4 मार्च रोजी ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.


सम्बन्धित सामग्री