IPL 2025 मध्ये नवे नियम : गोलंदाजांसाठी मोठा फायदा, BCCI चा मोठा निर्णय
IPl 2025 हंगामाची सुरूवात 22 मार्चपासून होणार आहे. या स्पर्धेआधी BCCI ने सर्व संघांच्या कर्णधारांसोबत बैठक घेतली. ही बैठक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयात पार पडली. या बैठकीत आयपीएलच्या काही नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. विशेषतः गोलंदाजांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
गोलंदाजांना मोठा दिलासा देत BCCI ने चेंडूवर लाळ लावण्यास परवानगी दिली आहे. 2020 मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा नियम लागू करण्यात आला होता. त्यानंतर गोलंदाजांना चेंडूवर लाळ वापरण्यास मज्जाव करण्यात आला होता. पण आता हा नियम मागे घेण्यात आला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने यापूर्वी लाळीवरील बंदी हटवण्याची मागणी केली होती.
IPL मध्ये खेळताना रात्रीच्या सामन्यांमध्ये दव याचा मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे गोलंदाजांना अडचण येते. यावर तोडगा काढण्यासाठी BCCI ने एक नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार, दुसऱ्या डावाच्या 11 व्या षटकानंतर नवीन चेंडू वापरण्याचा पर्याय संघांना मिळणार आहे.
यंदाच्या हंगामातील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. 22 मार्च रोजी होणाऱ्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हे संघ आमने-सामने येतील. तर स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना हा 20 मे रोजी हैदराबादमध्ये होईल. 21 मे रोजी हैदराबाद येथेच एलिमिनेटर सामना रंगणार आहे. यानंतर दुसरा क्वालिफायर सामना हा 23 मे रोजी कोलकाता येथे खेळला जाणार आहे. तर आयपीएलचा अंतिम सामना म्हणजे फायनल 25 मे रोजी कोलकाताच्या मैदानात होणार आहे.