T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषकाच्या 'सुपर 8' मधील महत्त्वाच्या वळणावर भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. युवा फलंदाज रिंकू सिंग आज चेन्नई येथे झालेल्या सराव सत्रात सहभागी झाला नाही. कुटुंबातील आपत्कालीन परिस्थितीमुळे रिंकू सिंगला घरी परतावे लागले. सराव सत्रातील त्याच्या अनुपस्थितीमुळे तो झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी सामन्यात खेळू शकणार नाही, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. रिंकू पुन्हा कधी संघात सामील होईल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या विश्वचषकात आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये रिंकू टीम इंडियाचा भाग होता, मात्र त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.
रिंकू सिंगची बॅट शांत; कामगिरीवर प्रश्नचिन्ह
या टी-20 विश्वचषकात रिंकू सिंगचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली, परंतु त्याची सर्वोच्च धावसंख्या केवळ 11 धावा राहिली आहे. या स्पर्धेत त्याने अनुक्रमे 6, 1, 11, 6 आणि 0 अशा धावा केल्या आहेत. फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिंकूच्या या खराब कामगिरीमुळे प्लेइंग इलेव्हन मधील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याच्या जागी कोणाला संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सेमीफायनलसाठी टीम इंडियाला 'करो या मरो'ची स्थिती
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ग्रुप स्टेजमध्ये सलग 4 सामने जिंकून दिमाखात सुपर 8 मध्ये प्रवेश केला होता. मात्र, सुपर 8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी मोठा पराभव केला. या पराभवामुळे भारताचे सेमीफायनलचे समीकरण कठीण झाले आहे. आता भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी झिम्बाब्वे आणि त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धचे दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील.
हेही वाचा - IND vs AUS : भारतीय क्रिकेटला दुहेरी झटका; पुरुषांनंतर महिला संघाचाही पराभव; ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी
सुपर 8 चे पुढील आव्हान
टीम इंडियाचा पुढील प्रवास आव्हानात्मक आहे. दक्षिण आफ्रिकेनेही आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली असल्याने, भारताला केवळ विजयच नाही तर आपला नेट रन रेटही सुधारावा लागणार आहे. जर भारताने दोन्ही सामने जिंकले, तरच टीम इंडिया सहजपणे सेमीफायनलसाठी पात्र ठरू शकेल. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना हा टीम इंडियासाठी पुनरागमन करण्याची शेवटची संधी मानली जात आहे.