मुंबई : भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ असा पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय खेळाडूंवर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कामगिरीवर बरेचसे प्रश्न केले जात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं कसोटी मालिका सुरु असताना कुठल्याच भारतीय खेळाडूंनी किंवा प्रशिक्षकांनी दिली नाहीत. पण बॉर्डर - गावस्कर कसोटी मालिका संपुष्टात आल्यावर भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंबाबत आपलं मत वक्त केलं.
गौतम गंभीर म्हणाला "मी नेहमीच म्हणतो की प्रत्येकाने डोमेस्टिक क्रिकेट खेळावे. डोमेस्टिक क्रिकेटला दिल जाणारं महत्त्व हे कमी आहे. एकच सामना नाही, जर खेळाडू उपलब्ध असतील आणि त्यांच्यात डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची बांधिलकी असेल, तर प्रत्येकाने डोमेस्टिक क्रिकेट खेळायला हवे.''
गंभीर पुढे म्हणाला, 'जर डोमेस्टिक क्रिकेटला महत्त्व दिलेच नाही, तर तुम्हाला टेस्ट क्रिकेटसाठी हवे ते खेळाडू कधीच मिळणार नाहीत.'
भारतीय वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा हे रणजी करंडक खेळून 10 वर्ष झाली आहेत. त्याचसोबत इतर मुख्य खेळाडू यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि रिषभ पंत हे देखील रणजी करंडक खेळून बराच काळ उलटला आहे.
भारत इंग्लंडविरुद्ध जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात भारतात टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळेल. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घेण्यासाठी भारतीय संघ यूएईमध्ये जाईल. या काळात ज्या खेळाडूंना संघात स्थान मिळाले नाही, त्यांच्यासाठी रणजी करंडकखेळण्याची संधी आहे. रणजी करंडक 23 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे.