Thursday, April 23, 2026 12:06:01 AM

Salman Ali Agha: सलमान आगाच्या गैरवर्तनावर ICC ची कठोर कारवाई; रनआऊट झाल्यानंतर ग्लोव्हज अन् हेल्मेट भिरकावल्याबद्दल मिळाली शिक्षा

बाद झाल्यानंतर मैदानात संताप व्यक्त करत ग्लोव्हज आणि हेल्मेट भिरकावल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे.

salman ali agha सलमान आगाच्या गैरवर्तनावर icc ची कठोर कारवाई रनआऊट झाल्यानंतर ग्लोव्हज अन् हेल्मेट भिरकावल्याबद्दल मिळाली शिक्षा

Salman Ali Agha: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय (ODI) सामन्यात पाकिस्तानी फलंदाज सलमान अली आगा याला आपल्या रागावर नियंत्रण न ठेवणे महागात पडले आहे. बाद झाल्यानंतर मैदानात संताप व्यक्त करत ग्लोव्हज आणि हेल्मेट भिरकावल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे. या गैरवर्तनामुळे सामना पंचांनी त्याला दोषी ठरवत त्याच्या शिस्तभंगाच्या नोंदीमध्ये 'डिमेरिट पॉईंट'ची भर घातली आहे.

रन आऊटचा निर्णय आणि सलमानचा सुटलेला संयम
मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात 39 व्या षटकात ही वादग्रस्त घटना घडली. मोहम्मद रिझवानने मारलेला फटका गोलंदाज मेहदी हसन मिराजने अडवला. यावेळी सलमान अली आगा क्रिजच्या बाहेर होता, ही संधी साधून मिराजने चेंडू यष्ट्यांवर फेकला. तिसऱ्या पंचांनी (Third Umpire) सलमानला 'रन आऊट' घोषित करताच त्याचा संयम सुटला. त्याने बांगलादेशचा यष्टिरक्षक लिटन दास याच्याशी शाब्दिक बाचाबाची केली आणि मैदान सोडण्यापूर्वी रागाच्या भरात आपले ग्लोव्हज जमिनीवर आपटून हेल्मेटही भिरकावून दिले.

ICC कडून 'डिमेरिट पॉईंट' आणि अधिकृत ताकीद
सामना पंच नियामूर रशीद यांनी सलमान अली आगाच्या या वर्तनाचा अहवाल ICC कडे सादर केला. ICC च्या आचारसंहितेतील कलम 2.2 चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला 'लेव्हल 1' दर्जाचा गुन्हा केल्याबद्दल अधिकृत ताकीद देण्यात आली आहे. त्याच्या खात्यावर आता एक 'डिमेरिट पॉईंट' जमा झाला असून, भविष्यात अशी चूक पुन्हा झाल्यास त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते. क्रिकेटमधील साहित्याचा गैरवापर आणि पंचांच्या निर्णयाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करणे याला ICC ने गंभीर मानले आहे.

हेही वाचा - Sunil Gavaskar : जिवावर उदार होऊन देशासाठी बॅटिंग.. नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा 'तो' किस्सा सांगताना 'लिटिल मास्टर' भावुक; पाहा Video

मैदानातील संघर्षानंतर पाकिस्तानचा विजय
या वादाच्या सावलीतही पाकिस्तानने सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 274 धावा केल्या होत्या. मात्र, पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्याने बांगलादेशसमोर 32 षटकांत 243 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. हे आव्हान पेलताना बांगलादेशचा संघ अवघ्या 114 धावांवर गारद झाला. पाकिस्तानने हा सामना 128 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
 


सम्बन्धित सामग्री