IND vs NZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील निर्णायक तिसरा सामना आज गुवाहाटीच्या बारासपारा स्टेडियमवर रंगत आहे. मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून 2-0 अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. हा सामना जिंकल्यास टीम इंडिया मालिकेत 3-0 अशी अजिंक्य आघाडी घेईल.
संघात मोठे बदल, बुमराह परतला
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकल्यानंतर संघात दोन महत्त्वाचे बदल केल्याचे जाहीर केले. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी जगातील सर्वात घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांचा अंतिम 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. दव पडण्याच्या शक्यतेमुळे भारताने लक्ष्याचा पाठलाग करणे पसंत केले आहे.
हेही वाचा - Shahid Afridi On ICC : बांगलादेशच्या हकालपट्टीने आफ्रिदीचा तीळपापड; ICC वर दुजाभावाचा आरोप करत पुन्हा ओकली गरळ
संजू सॅमसनसाठी अस्तित्वाची लढाई
आजच्या सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत सलामीला येत असलेल्या सॅमसनला या मालिकेतील दोन सामन्यांत केवळ 16 धावा करता आल्या आहेत. त्यामुळे आपली जागा टिकवण्यासाठी त्याला आज मोठी खेळी करावीच लागेल. दुसरीकडे, नागपूरचा हिरो अभिषेक शर्मा आणि फॉर्मात असलेला सूर्यकुमार यादव यांच्याकडून चाहत्यांना पुन्हा एकदा फटकेबाजीची अपेक्षा आहे.
मैदानावरील आकडेवारी आणि इतिहास
भारतासाठी गुवाहाटीचे मैदान आतापर्यंत फारसे चांगले ठरलेले नाही. येथे खेळलेल्या 4 सामन्यांपैकी टीम इंडियाला केवळ 1 विजय मिळवता आला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 27 टी-20 सामने झाले असून भारताने 16 तर किवींनी 10 सामने जिंकले आहेत. मागील 16 पैकी 14 सामन्यांत भारताचे वर्चस्व राहिले आहे.
अंतिम प्लेइंग-11
भारतीय संघ: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड संघ: डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी.