पर्थ : पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडाली. भारताचा दणदणीत विजय झाला. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत चौथ्या दिवशीच भारताचा 295 धावांनी विजय झाला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने पहिल्या डावात सर्वबाद 150 धावा आणि दुसऱ्या डावात सहा बाद 487 धावा करुन डाव घोषीत केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 104 आणि दुसऱ्या डावात सर्वबाद 238 धावा केल्या. जसप्रीत बुमराह सामनावीर झाला. बुमराहने ऑस्ट्रेलियाचे दोन डावात मिळून आठ फलंदाज बाद केले. दुसऱ्या महायुद्धानंतर ऑस्ट्रेलियात किमान ३० कसोटी खेळलेल्या गोलंदाजांमध्ये सर रिचर्ड हेडली वगळता बुमराहची सरासरी ही सर्वोत्तम आहे. बुमराहच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारताने पर्थ कसोटीत ऐतिहासिक कामगिरी केली.
पर्थ कसोटी कर्णधार जसप्रीत बुमहारने 72 धावात आठ विकेट घेतल्या. भारतीय कर्णधारांमध्ये ही चौथ्या नंबरची सर्वोत्तम कामगिरी आहे. बुमराहच्या पुढे बिशन सिंह बेदी आणि कपिल देव आहेत. याआधी 1983 मध्ये कपिल देव यांनी 135 धावा देत दहा विकेट घेतल्या होत्या. तर बेदींनी 1977 मध्ये 194 धावा देत दहा आणि 1976 साली 70 धावा देत नऊ विकेट घेतल्या होत्या.
भारताने पर्थमध्ये विजय मिळवत पाच कसोटी सामनयांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया संघाने पर्थ मैदानावर कसोटी सामना गमवण्याची ही पहिली वेळ आहे. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर धावांचा विचार करता भारताने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी 1977 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा मेलबर्न येथे 222 धावांनी पराभव केला होता. तर 2008 मध्ये भारताने मोहालीत ऑस्ट्रेलियाला 320 धावांनी धूळ चारली होती.
ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर खेळताना मालिकेतील पहिला कसोटी सामना गमावण्याची ही पहिली वेळ आहे. याआधी 2008 आणि 2016 साली दक्षिण आफ्रिकेने त्यांचा मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव केला होता. तर भारतीय संघाने 2018 आणि आता यावेळी अशा दोन वेळा त्यांचा पहिल्याच सामन्यात पराभव केला.
पर्थ कसोटीतील भारताच्या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट रँकिंगमध्ये बदल झाला आहे. भारताचे 110 गुण झाले आहेत. आतापर्यंत भारत 15 कसोटी सामने खेळला. यातील यातील नऊ कसोटी सामने जिंकला. भारताच्या एका कसोटी सामन्याचा निर्णय लागला नाही. या व्यतिरिक्त पाच कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला. न्यूझीलंड विरुद्धची मालिका भारताने गमावली. यामुळे भारताच्या विजयाची टक्केवारी 61.110 झाली आहे. सध्या भारत वर्ल्ड टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले. यातील आठ सामन्यांत त्यांनी विजय मिळवला. एका सामन्याचा निकाल लागला आणि चार सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी 57.690 एवढी झाली आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे चार कसोटी सामने अद्याप खेळून व्हायचे आहेत. या सामन्यांमध्ये भारत कशी कामगिरी करतो यावर भारताचे वर्ल्ड टेस्ट रँकिंगमधील स्थान अवलंबून आहे. नियमानुसार वर्ल्ड टेस्ट रँकिंगचे अव्वल दोन संघ फायनल खेळतात. सध्या पहिल्या स्थानी भारत आणि दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे. यामुळे सद्यस्थितीनुसार वर्ल्ड टेस्ट स्पर्धेच्या फायनलामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.