Saturday, February 15, 2025 01:02:18 PM

India Vs Australia 5th Test match
भारत ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पाचवा कसोटी सामना हरला

१० वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने पटकावली बॉर्डर - गावस्कर ट्रॉफी

भारत ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पाचवा कसोटी सामना हरला

 

मुंबई: बॉर्डर - गावस्कर ट्रॉफीचा पाचवा सामना सिडनीच्या ऐतिहासिक एससीजी मैदानात झाला. भारतासाठी हा सामना अत्यंत आवश्यक होता, कारण पणावर होती बॉर्डर - गावस्कर ट्रॉफी. पण भारताच्या निराशाजनक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया संघ 10 वर्षांनी बॉर्डर - गावस्कर ट्रॉफी जिंकू शकला.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने 141 धावा केल्या. रिषभ पंतच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताचे सामन्यात पुनरागमन झाले होते. भारताने तिसऱ्या दिवशी 6 बाद 141 वरून डाव सुरु केला. वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांच्याकडून काही तरी चमत्कार होऊ दे अशी सगळ्या भारतीयांची प्रार्थना होती. रवींद्र जडेजाने सुरवातीस पॅट कंमिन्सला पॉईंटच्या दिशेनं एक अप्रतिम चौकार खेचला. पण, काहीच क्षणात तो देखील बाद झाला. त्याच्या पाठोपाठ वॉशिंग्टन सुंदरदेखील बाद झाला. या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंच्या विकेटनंतर भारताच्या 200 धावांचा टप्पा पार करण्याच्या अपेक्षादेखील भंगल्या. स्कॉट बोलँडच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज जास्त काळ मैदानात टिकू शकले नाहीत. भारताचा डाव 157 धावा करून संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँडने 6 विकेट्स घेतल्या, तर पॅट कमिन्सने3 आणि वेब्स्टरने 1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली सुरवात केली. सॅम कॉन्स्टेसने आक्रमक फलंदाजी करून भारतीय गोलंदाजांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला. पण 22 धावा करून तो बाद झाला. त्यानंतर लाबूशेन आणि स्टिव्ह स्मिथदेखील बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 बाद 58 अशी झाली. पण त्यानंतर भारताला भासली ती कर्णधार जसप्रीत बुमराहची उणीव. दुखापतग्रस्त बुमराह गोलंदाजी करायला आला नाही. भारताची अनुभवहीन गोलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बाद करू शकली नाही. ऑस्ट्रेलियाने सहजगत्या 162 धावांचे लक्ष्य पूर्ण केले.

भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णाने ३ तर मोहम्मद सिराजने 1 बळी घेतला. पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 6  विकेट्स घेणारा स्कॉट बोलँड सामनावीर ठरला.
मालिकेत 32 गडी बाद करणारा भारताचा जसप्रीत बुमराहला मालिकावीर खिताबाने गौरवण्यात आले.


सम्बन्धित सामग्री