Thursday, March 20, 2025 04:38:22 AM

इंग्लंडने केली निराशाजनक कामगिरीची पुनरावृत्ती

शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशकतकीय खेळीमुळे भारताने नोंदवला सहज विजय

इंग्लंडने केली निराशाजनक कामगिरीची पुनरावृत्ती

मुंबई: भारत आणि इंग्लंडमधील पहिला एकदिवसीय सामना नागपूरमध्ये झाला. टी 20 मालिकेतील निराशाजनक कामगिरीची पुनरावृत्ती इंग्लंड संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यातदेखील केली.  

नाणेफेक जिंकून इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेले बेन डकेट आणि फिल सॉल्ट यांनी येताच आक्रमक पवित्रा स्वकारला.  
इंग्लंडने 6 षटकात बिनबाद 50 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी पदार्पण कारणाऱ्या हर्षित राणाला 'टार्गेट' केले. हर्षितच्या पहिल्या 3 षटकात 37 धावा या दोन्ही फलंदाजांनी केल्या. धावसंख्या जलद गतीने 100 च्या जवळ जात होती असं वाटत असताना इंग्लंडकडून एक चूक झाली. धाव घेताना दोन्ही फलंदाजांमधला ताळमेळ बसला नाही आणि यामुळे सॉल्ट धावचीत झाला. त्यानंतर मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज पॅव्हेलियनच्या दिशेने वळू लागले. हर्षित राणाने एकाच षटकात बेन डकेट आणि हॅरी ब्रुकला बाद केलं. बिनबाद 75 वरून 3 बाद 77 अशी धावसंख्या झाली. इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा मानला जाणारा जो रूट सांभाळत डाव पुढे नेत होता. तो मैदानात 'सेट' होणार असं वाटताच जडेजाने त्याला पायचीत केलं.  

कर्णधार जोस बटलर आणि जेकब बेथल यादोन्ही खेळाडूंनी इंग्लंडचा डाव पुढे नेला. दोघांनी अर्धशतके झळकावली. मात्र, अर्धशतकला शतकामध्ये रूपांतरित करू शकले नाहीत. जडेजाने बेथलला तर अक्षर पटेलनं जोस बटलरला बाद केलं. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 21 धावा केल्या. 48 व्या षटकात 247 च्या धावसंख्येवर इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला. भारताकडून हर्षित राणा आणि जडेजाने प्रत्येकी 3-3 तर अक्षर पटेल, शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.  

भारताची फलंदाजीतील सुरवात गोलंदाजी प्रमाणेच झाली इंग्लंड संघाने भारतावर वर्चस्व गाजवायला सुरवात केली. रोहित शर्मा 2 तर जैस्वाल 15 धावांवर बाद झाले. जैस्वालचे पुनरागमन हे विस्मरणीय राहिले. तो त्याच्या कामगिरीने काही जास्त प्रभाव टाकू शकला नाही. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीच्या जागी आलेला शुभमन गिल आणि चौथ्या क्रमांकावर आलेला श्रेयस अय्यर यांच्या खांद्यावर भारताचा डाव होता. भारताची धावसंख्या 2 बाद 19 होती आणि अय्यर मैदानात आला. अय्यरने येताच आक्रमक फलंदाजी सुरु केली. अय्यरविरुद्ध 'शॉर्ट बॉल'चा उपयोग इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी केला. मात्र, अय्यरने इंग्लंडच्या सर्व योजनांवर पाणी फेरले. अय्यरने 36 चेंडूत 59 धावा केल्या आणि बाद झाला. इंग्लंडला त्यानंतर सामन्यात पुनरागमन करण्याची संधी होती. मात्र, अक्षर पटेलच्या अर्धशतकामुळे आणि शुभमन गिलच्या 87 धावांच्या खेळीमुळे सामना भारताच्या हातातून निसटला नाही. भारताने 39 व्या षटकात सामना जिंकला.  
शुभमन गिलच्या अर्धशतकासाठी त्याला सामनावीर म्हणून घोषित केलं गेलं. भारत आणि इंग्लंडमधला दुसरा एकदिवसीय सामना 9 फेब्रुवारीला ओडिशाच्या कट्टकमध्ये होणार आहे.


सम्बन्धित सामग्री