रोहित शर्माच्या झुंजार शतकी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ४ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. रोहित शर्माने सलामीला येत ९० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ११९ धावांची खेळी साकारली. गिलने त्याला ५२ चेंडूत अर्धशतक झळकावत मोलाची साथ दिली. रोहित शर्माला सामनावीरच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह भारताने इंग्लंडविरोधात घरच्या मैदानावर सलग सातवी मालिका जिंकली.
इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी ३०५ धावांचे आव्हान ठेवले होते. तेव्हा रोहित शर्मा आणि शुभमन गिलची सलामी जोडी मैदानात उतरली. या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसे काढली. पहिल्या १० षटकात दोघांनी ७७ धावा करत इंग्लंडला बॅकफुटवर ढकलले. एका बाजूने रोहित शर्मा इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने मैदानाच्या चौफेर भागात षटकार, चौकारांची आतिषबाजी करत क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन केले.
भारताच्या सलामी जोडीने शतकी धावसंख्या फलकावर लावली. संघाची धावसंख्या १३६ असताना, ओव्हरटनच्या परफेक्ट यॉर्कर चेंडूवर गिलच्या दांड्या उडाल्या. गिलने ५२ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकारांच्या मदतीने ६० धावांची खेळी साकारली. त्यानंतर आलेला विराट कोहली स्वस्तात बाद झाला. त्याला आदिल रशिदने व्यक्तिगत ५ धावांवर सॉल्टकरवी बाद केले.
दुसरी बाजू लावून धरत रोहितने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. त्याला श्रेयश अय्यरची साथ लाभली. शतक पूर्ण झाल्यानंतर रोहित शर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने ९० चेंडूत १२ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकारांसह ११९ धावांची ताबडतोड खेळी केली. रोहित बाद झाल्यानंतर अय्यर आणि अक्षर पटेल या जोडीने संघाला विजयाच्या समीप नेले.
संघाची धावसंख्या २५८ वर असताना अय्यर धावबाद झाला. त्याने ३ चौकार आणि १ षटकारासह ४४ धावांचे योगदान दिले. अय्यरनंतर के एल राहुल (१०) स्वस्तात बाद झाला. अक्षर पटेलने एक बाजू लावून धरली. विजयाच्या उंबरठ्यावर असताना हार्दिक (१०) बाद झाला. अक्षर-जडेजा जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अक्षरने नाबाद ४१ धावा केल्या. भारताने इंग्लंडचे ३०५ धावांचे आव्हान ४४.३ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
तत्पूर्वी, कटकमध्ये इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार बटलरचा निर्णय सार्थ ठरवत फिलिप सॉल्ट-बेन डकेत जोडीने १० षटकात बिनबाद ७५ धावांची सलामी दिली. वरूण चक्रवर्तीने सॉल्टला रविंद्र जडेजाकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. सॉल्टने २६ धावा केल्या. त्यानंतर संघाची धावसंख्या १०२ असताना रविंद्र जडेजाने डकेतला बाद केले. बेन डकेतने ५६ चेंडूत १० चौकारांसह ६५ धावांची खेळी केली. यानंतर जो रूटने हॅरी ब्रूकसह संघाची सूत्रे हाती घेतली आणि इंग्लंडचा धावसंख्या २७ षटकांत १५० धावांपर्यंत पोहोचवली.
हर्षित राणाने ३० व्या षटकात हॅरी ब्रूकला बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. ब्रुकला ३१ धावा करता आल्या. ब्रूक बाद झाल्यानंतर रूट आणि कर्णधार जोस बटलरने संघाचा डाव पुढे नेला. या जोडीने इंग्लंडला ३५ षटकांत २०० धावांचा पल्ला गाठून दिला. संघाची धावसंख्या २४८ वर पोहोचली असता जो रूट व्यक्तिगत ६९ धावांवर बाद झाला. त्याला जडेजाने विराट कोहली करवी झेलबाद केले. त्यानंतर बटलर (३४), लिव्हिगस्टोन (४१), आदिल रशिद (१४) यांनी छोट्या छोट्या भागिदारी करत संघाला तीनशे पार केले. इंग्लंडने ४९.५ षटकात सर्वबाद ३०४ धावा केल्या. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर शमी, राणा, हार्दिक, वरूण यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.