मुंबई: टी 20 मालिकेत इंग्लंड संघाला पराभूत करून आता भारतीय संघ ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघाचे काही मुख्य खेळाडू नागपूरच्या व्हीसीए ग्राऊंडवर पोहचले आहेत. तसेच इंग्लंड संघाचा स्टार फलंदाज जो रूटदेखील भारतात पोहचला आहे. 5 वर्ष 10 महिने 30 दिवसांनी नागपूरला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना आयोजित करण्याची संधी मिळाली आहे.
भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत, शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा समाविष्ट केले गेले आहेत. या खेळाडूंच्या येण्याने भारतीय संघ अजून मजबूत झाला आहे. भारतीय चाहत्यांची विराट कोहली आणि रोहित शर्माकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. विराट कोहली आणि रोहित शर्माची गेल्या सहा महिन्यातील कामगिरी ही त्यांच्या पातळी प्रमाणे अशोभिनी होती. रोहित आणि विराटच्या कामगिरीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जर भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची असेल तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला उत्तम कामगिरी करावी लागणार आहे. या खेळाडूंबरोबर अजून 2 खेळाडूंकडे सर्वांचेच लक्ष राहील, ते म्हणजे श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी. श्रेयस अय्यरची डोमेस्टिक क्रिकेटमधील कामगिरी उत्तम राहिली आहे. त्याने विजय हजारे, सय्यद मुश्ताक अली आणि रणजी करंडकात चांगली लय दाखवली होती. शमीने टी20 मध्ये पुनरागमन केले होते, मात्र शमीची गोलंदाजीत धार दिसली नाही.
इंग्लंड संघाच्या दृष्टीने ही मालिका अत्यावश्यक आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगोदर इंग्लंड संघासाठी ही शेवटची एकदिवसीय मालिका असेल. भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती यात खूप साम्य आहे. इंग्लंड संघासाठी ही मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सरावासाठी उत्तम संधी आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल(उपकर्णधार), श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
इंग्लंड
जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), बेन डकेट, जो रूट, फिलिप सॉल्ट, जेमी स्मिथ, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, साकिब महमूद, आदिल रशीद, मार्क वुड.