मुंबई : भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचं वर्चस्व संपूर्ण विश्व क्रिकेटमध्ये आहे. जसप्रीत बुमराह त्याची कामगिरी प्रत्येक सामन्यात उंचवत आहे. जसप्रीत बुमराहची गणना ही क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटचा महानायक विराट कोहली यांच्याबरोबर केली जात आहे.
कसोटी असो एक दिवशीय सामने असो किंवा टी 20 सामने, बुमराह भारतीयांना कधीच आपल्या कामगिरीने नाराज करताना दिसत नाही. बुमराहच्या कसोटी क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीचं फळ त्याला आयसीसीच्या कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजांच्या क्रमावारीतून मिळालं आहे. बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत उच्च क्रमांकावर गेला आहे. जसप्रीत बुमराह 907 गुणांसह प्रथम क्रमांकावर गेला आहे.
तसेच, भारतीय गोलंदाजांमध्ये 904 गुण हे सर्वश्रेष्ठ होते. रविचंद्रन अश्विनच्या नावावर हा विक्रम होता. 907 गुण मिळवून हा विक्रम बुमराहने आपल्या नावावर केला आहे. आयसीसीच्या एक दिवशीय क्रिकेटच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत 645 गुणांसह बुमराह 7 व्या क्रमांकावर आहे.
सध्या सुरु असलेली बॉर्डर - गावस्कर मालिकेत 30 बळी घेऊन सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याने भारताचे कर्णधारपददेखील भूषवले.
भारत सध्या 2 - 1 च्या फरकाने बॉर्डर - गावस्कर मालिकेत पिछाडीवर आहे. दोन्ही संघातील 5वा आणि शेवटचा सामना सिडनीच्या ऐतिहासिक मैदानात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला सामना जिंकण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. भारतीय चाहत्यांचं लक्ष हे कर्णधार रोहित शर्मा आणि पूर्व कर्णधार विराट कोहली यांच्या कामगिरीवर नक्कीच असेल. हा सामना 3 जानेवारीला सुरु होईल.