Tuesday, February 17, 2026 08:42:09 AM

Mary Kom Ex Husband: ‘तिच्या स्वप्नांसाठी मी माझं करिअर सोडलं आणि तिथेच मी…’; मेरी कॉमच्या आरोपांवर माजी पती ऑनलरचा थेट पलटवार

मेरी कॉम यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर माजी पती ऑनलर यांनी ते फेटाळले आहेत.

mary kom ex husband ‘तिच्या स्वप्नांसाठी मी माझं करिअर सोडलं आणि तिथेच मी…’ मेरी कॉमच्या आरोपांवर माजी पती ऑनलरचा थेट पलटवार

Mary Kom Ex Husband: भारतीय बॉक्सिंग विश्वातील दिग्गज खेळाडू मेरी कॉम आणि तिचे माजी पती करुंग ओनखोलर कॉम उर्फ ऑनलर यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मेरी कॉम यांनी पतीवर आर्थिक फसवणूक आणि स्वतःच्या कष्टाच्या कमाईचा गैरवापर केल्याचा आरोप केल्यानंतर, आता ऑनलर यांनी या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, “मी काही चुकीचं केलं असेल तर पुरावे सादर करा,” असे खुले आव्हान दिले आहे.

एका मुलाखतीत बोलताना ऑनलर यांनी सांगितले की, जवळपास दोन दशकांच्या वैवाहिक आयुष्यात त्यांनी मेरी कॉमला प्रत्येक पातळीवर साथ दिली. मेरी यांनी आपण एकट्याने कमाई केली आणि पतीने काहीही योगदान दिले नाही, असा दावा केल्याने ते व्यथित झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “माझ्याकडे ना मोठी संपत्ती आहे, ना बँकेत पैसे. माझ्या नावावर फक्त गावातील एक शेतजमीन आहे, तीही माझ्या वडिलांनी लग्नाआधी घेतलेली,” असे त्यांनी सांगितले. सध्या आपण दिल्लीत भाड्याच्या घरात राहत असून, साधं आयुष्य जगत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मेरी कॉम यांनी केलेल्या आरोपांनुसार, ऑनलर यांनी तिच्या नावावर कर्ज घेतले, मालमत्ता गहाण ठेवली आणि परवानगीशिवाय आर्थिक व्यवहार केले. मात्र, ऑनलर यांनी हे सर्व आरोप ठामपणे नाकारले. “माझे पॅन कार्ड, कर विवरणपत्र तपासा. मी कधीही तिच्या पैशांचा गैरवापर केलेला नाही,” असे सांगत त्यांनी आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले.

ऑनलर यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील भूमिकेबाबतही खुलासा केला. त्यांनी सांगितले की, मेरी कॉमच्या बॉक्सिंग कारकिर्दीला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी स्वतःची कारकीर्द बाजूला ठेवली. “मी UPSC ची तयारी करत होतो. तसेच शिलाँगच्या एक्साइज आणि कस्टम्स विभागासाठी करारावर फुटबॉल खेळत होतो. पण मेरीने मला तिच्यासाठी करिअर सोडून कुटुंब सांभाळायला सांगितले,” असे त्यांनी सांगितले.

मेरी कॉम सतत प्रशिक्षण, स्पर्धा आणि दौऱ्यांमध्ये व्यस्त असायच्या. त्या काळात मुलांची जबाबदारी, घरकाम, रोजच्या गरजा सगळं काही आपणच सांभाळल्याचा दावा ऑनलर यांनी केला. “मी मुलांना अंघोळ घालायचो, जेवण देत होतो, कोचिंगला घेऊन जायचो. घर चालवणं माझी जबाबदारी होती,” असे ते म्हणाले.

घटस्फोटाबाबत ऑनलर यांनी स्पष्ट केले की, मेरी कॉमच्या वैयक्तिक आयुष्याविषयी किंवा तिच्या पुढील निर्णयांवर त्यांना आक्षेप नाही. मात्र, आपल्या योगदानाला कमी लेखणारी वक्तव्ये त्यांना वेदनादायक वाटल्याचे त्यांनी सांगितले. “मी तिचा ड्रायव्हर होतो, स्वयंपाकी होतो, सगळं केलं. मला गुलामासारखं जगावं लागलं, पण ते प्रेम आणि कुटुंबासाठी होतं,” असे भावनिक शब्दांत त्यांनी सांगितले.

हा वाद आता केवळ वैयक्तिक न राहता सार्वजनिक चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे मेरी कॉम यांची यशस्वी कारकीर्द आणि त्यामागील संघर्ष, तर दुसरीकडे ऑनलर यांचा ‘कुटुंबासाठी केलेल्या त्यागाचा’ दावा या दोन्ही बाजूंमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. पुढे या आरोप-प्रत्यारोपांवर कायदेशीर पातळीवर काय घडते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री