Thursday, February 12, 2026 03:22:23 PM

Mary Kom :‘20 वर्षांचं सत्य मी लपवलं होतं, त्याने मला फसवलं…’ मेरी कॉमचे पतीवर गंभीर आरोप; प्रथमच घटस्फोटामागचं कारण उघड

मेरी कॉम यांनी २० वर्षांच्या विवाहानंतर घटस्फोटामागील कारणे उघड केली. आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि मानसिक त्रासाचे आरोप करत आपण ही लढाई लढणारच असल्याचं त्यांनी सांगितलं.

mary kom ‘20 वर्षांचं सत्य मी लपवलं होतं त्याने मला फसवलं…’ मेरी कॉमचे पतीवर गंभीर आरोप प्रथमच घटस्फोटामागचं कारण उघड

Mary Kom: सहा वेळा जागतिक बॉक्सिंग विजेती ठरलेली मेरी कॉम केवळ रिंगमध्येच नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही मोठी लढाई लढत असल्याचं चित्र आता समोर आलं आहे. राजत शर्मा यांच्या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच उघडपणे बोलताना मेरी कॉम यांनी पतीपासून घटस्फोट घेण्यामागील कारणांचा थेट आणि स्पष्ट खुलासा केला. जवळपास २० वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात आपण अनेक गोष्टी गुप्त ठेवल्या होत्या, पण आता सत्य बाहेर येणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

मेरी कॉम म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षांपासून त्या हे सगळं मनातच दडवून ठेवलं होतं. “मी त्याला सोडलं नाही, त्याने मला फसवलं,” असं ठामपणे सांगत त्यांनी पती करुंग ओनखोलर उर्फ ऑनलर यांच्यावर गंभीर आरोप केले. पतीने मुलांची काळजी घेतली, घर सांभाळलं, हा दावा त्यांनी साफ फेटाळला. “तो दिवसभर झोपायचा. त्याची कोणती यशस्वी कारकीर्द होती? तो एक रुपयाही कमवत नव्हता,” असं परखड विधान त्यांनी केलं.

मेरी कॉम यांनी सांगितलं की, आपण देशासाठी, कुटुंबासाठी सतत झटत असताना पती मात्र त्यांच्या कमाईवर अवलंबून होता. “मी इतकी मेहनत करून पैसे कमवत होते, माझा पूर्ण विश्वास त्याच्यावर होता. पण नंतर कळलं की तो माझ्या खात्यांमधील पैसे काढत होता,” असं त्या म्हणाल्या. पती असल्यामुळे आपण कधीही बँक खात्यांकडे लक्ष दिलं नाही, कारण सगळं आपल्या भल्यासाठीच होतं असं वाटत होतं, अशी कबुलीही त्यांनी दिली.

खरी परिस्थिती त्यांना दुखापतीनंतर समजल्याचं मेरी कॉम यांनी सांगितलं. “मी जखमी झाले आणि त्यानंतर सगळं उघड झालं. कदाचित देवानेच माझ्या भल्यासाठी हे दाखवलं,” असं त्या म्हणाल्या. त्यांनी एक धक्कादायक प्रसंगही सांगितला पतीने सकाळी लवकर बँकेत जाऊन त्यांच्या खात्यातून १० लाख रुपये काढले आणि फक्त ३० हजार काढल्याचं खोटं सांगितलं. असे प्रकार दोनदा घडल्याचा दावा त्यांनी केला.

या सगळ्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या कोलमडल्याचं सांगत, “मी माझ्या मुलांसोबत वेळ घालवू शकले नाही, आई म्हणून त्यांना प्रेम देऊ शकले नाही. अशा माणसासोबत मी आनंदी कशी राहू?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कार्यक्रमात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही प्रश्न विचारण्यात आले. व्यावसायिक भागीदारासोबतच्या नात्याबाबत त्यांनी स्पष्ट केलं की ते प्रकरण संपलं असून घटस्फोट शांतपणे झाला आहे. तसेच राजकारणात येण्याच्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मला राजकारणात रस नाही. पतीनेच मला नेत्यांकडे घेऊन जाण्यासाठी दबाव टाकला,” असा आरोप त्यांनी केला.

मेरी कॉम यांनी शेवटी आपल्या चाहत्यांना उद्देशून भावनिक आवाहन केलं. “तुम्ही मला साथ द्या किंवा नाही, पण सत्य एक दिवस नक्की समोर येईल. मी फायटर आहे, आणि ही लढाईही मी लढणारच,” असं म्हणत त्यांनी मुलाखतीचा शेवट केला.

या खुलाशांनंतर मेरी कॉम यांचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं असून, त्यांच्या वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री